“साता समिंदराचं माणिक मोती । देवाच्या हातानं आलं रे खालती । झेललं रे झेललं वरच्या वरती । पिकाच्या डोईवर कणसात भरतंय ।”
“साता समिंदराचं माणिक मोती । देवाच्या हातानं आलं रे खालती । झेललं रे झेललं वरच्या वरती । पिकाच्या डोईवर कणसात भरतंय ।”
मराठी गीतसृष्टीत अनेक नावे आली आणि काळाच्या ओघात इतिहासजमा झाली. परंतु पी. सावळाराम हे नाव मराठी गीतसृष्टीच्या जगतात कायमचं कोरलं गेलं आहे. त्यांच्या तीस वर्षांच्या कारकिर्दीत पी. सावळाराम यांनी ५२ चित्रपटांसाठी सुमारे २०० गीतं आणि गैर-चित्रपट सुगम संगीतात १२५ हून अधिक गीतरचना केल्या. त्यात अनेक चित्रगीतं, भावगीतं, भक्तिगीतं, गवळणी, लावण्या, नाट्यगीतं, लोकगीतं अशा अनेक गीतप्रकारांचा समावेश आहे. यातील अनेक गाणी मराठी मनांमध्ये अजरामर झाली आहेत.
पी. सावळाराम, अर्थात निवृत्तीनाथ रावजी पाटील, यांचा जीवनप्रवास एका ग्रामीण, सामान्य कुटुंबातून सुरू होऊन मराठी साहित्य आणि समाजकारणाच्या सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचला. ४ जुलै १९१४ रोजी सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी या आजोळी निवृत्तीचा जन्म झाला. त्याचे वडील आबाजी पाटील तर आई भागीरथीबाई. पाटील घराणं मूळचं विदर्भातील असलं, तरी ते सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी येथे स्थायिक झालं होतं.
निवृत्तीचं बालपण साधेपणात व्यतीत झालं. आर्थिकदृष्ट्या सामान्य असलेल्या या कुटुंबात सात मुलं आणि दोन मुली होत्या. त्यापैकी निवृत्ती सर्वात मोठा. १९२० साली, सहा वर्षांचा असताना, त्याला चुलते रावजी यांनी दत्तक घेतलं, त्यामुळे त्याचं नाव निवृत्ती रावजी पाटील झालं. मात्र, रावजींचं लवकरच निधन झाल्याने निवृत्ती आपल्या जन्मदात्या आई-वडिलांकडेच वाढला.
निवृत्तीच्या मनावर सर्वात मोठा काव्यसंस्कार त्याच्या आईचा, भागीरथीबाईंचा झाला. भागीरथीबाई फारशा शिकलेल्या नव्हत्या, पण त्या ओव्या, भारुडे आणि अभंग सहजपणे रचायच्या. घरकाम करताना, शेतावर जाताना किंवा सणासुदीच्या तयारीत त्या जी गीते गायच्या, त्यातूनच निवृत्तीच्या मनात शब्दांचं बीज रोवलं गेलं आणि कवितेचा अंकुर तेव्हा फुटला.
निवृत्तीचं तिसरीपर्यंतचं शिक्षण गोटखिंडीतील शाळेत झालं. अभ्यासात त्याचा कायम पहिला क्रमांक असे. चौथीसाठी वडिलांनी त्याला तासगावच्या हायस्कूलमध्ये पाठवलं. तिथे निवृत्तीचा आत्मविश्वास वाढला. तासगावच्या शाळेत त्याचा परिचय विठ्ठल सखाराम पागे या तेजस्वी तरुणाशी झाला. विठ्ठल पागे यांच्या ‘दत्तात्रय मंडळा’मुळे त्याला व्यायाम, अध्यात्म आणि साहित्याची गोडी लागली. विठ्ठल पागे यांनी ह. ना. आपटे यांच्या ‘उषःकाल’ कादंबरीतील ‘सावळ्या’ या पात्रावरून त्याला ‘सावळ्या’ हे टोपणनाव दिलं. त्याला हे नाव खूप आवडलं.
घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे पाचवी उत्तीर्ण झाल्यावर निवृत्तीच्या शिक्षणात खंड पडला. एक वर्ष घरी राहून वडिलांनी पैसे जमा केले आणि १९२९ मध्ये त्याचा दाखला साताऱ्याच्या ‘सरकारी शाळेत’ घेतला. परंतु नंतर त्यानं १९३० मध्ये कोल्हापूरमधल्या राजाराम हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि तो कष्टानं मॅट्रिकची परीक्षा १९३५ मध्ये यशस्वीरित्या उत्तीर्ण झाला.
महाविद्यालयीन शिक्षणासाठी पैसे जमवण्यासाठी निवृत्तीनं १९३५ ते १९३७ या दोन वर्षांत कोल्हापूरच्या ‘प्रिन्स शिवाजी विद्यालयात’ शिक्षकाची नोकरी केली. याच काळात त्याचा धाकटा भाऊ सीताराम याच्या शिक्षणाची जबाबदारीही त्यानं उचलली.
१९३७ मध्ये निवृत्तीनं कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. या कॉलेजमध्ये प्राचार्य डॉ. बाळकृष्ण आणि प्राध्यापक त्रयी (ना. सी. फडके, प्रा. माधवराव पटवर्धन (माधव जुलियन) आणि प्रा. द. सी. पंगू) यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या काव्यलेखनाला नवी दिशा मिळाली. माधव जुलियन यांना त्यानं आपले गुरू मानलं. माधव जुलियन यांनी त्याच्या काव्यप्रतिभेला दिशा दिल्ली.
या वातावरणात निवृत्तीनं आपल्या कविता ‘राजारामियन’ मासिकात प्रकाशित करण्यास सुरुवात केली. कॉलेजमधील मित्रांनी दिलेल्या ‘सावळ्या’ या नावाचा आधार घेऊन त्यानं आपल्या कविता ‘सावळाराम’ या नावाने प्रसिद्ध करण्याचा निश्चय केला. नंतर त्यानं आपल्या पाटील आडनावातलं ‘पी’ जोडून ‘पी. सावळाराम’ हे नाव स्वीकारलं.
कॉलेजमध्ये असताना, वर्गातील सावळी मुलगी चिडवली जात असल्याचं पाहून त्यानं ‘सौंदर्य रंगात नाही, तर अंतरंगात असतं’ या विचारातून ‘काळा गुलाब’ ही कविता लिहिली. या कवितेमुळे त्याला कॉलेजमध्ये सर्वप्रथम प्रसिद्धी मिळाली. १९४३ मध्ये त्यानं बी. ए.ची परीक्षा उत्तीर्ण केली.
१९४२ मध्ये साताऱ्यात असताना सावळारामांची ओळख त्यांचा मित्र विनायक जाधव याची बहीण कृष्णा हिच्याशी झाली. ७ मे १९४३ रोजी कोल्हापूरमधील राधाकृष्ण मंदिरात सावळारामांचा कृष्णाशी विवाह झाला. लग्नानंतर कृष्णाचं नाव बदलून ‘सुनंदा’ ठेवण्यात आलं. सावळारामांनी पुढील शिक्षणासाठी बेळगावमध्ये बी. टी.चा अभ्यास सुरू केला, पण कुटुंबाच्या जबाबदारीमुळे १९४४ मध्ये अभ्यास अर्धवट सोडून ते परत आले.
२४ जुलै १९४४ रोजी त्यांना कन्यारत्न (प्रतिभा) प्राप्त झालं. संसारासाठी अर्थार्जन आवश्यक असल्याने सावळारामांनी मुंबई–पुण्याकडे नशीब आजमावण्याचा विचार केला. सासऱ्यांच्या मदतीने १९४४ च्या अखेरीस त्यांनी पत्नी सुनंदाबाई आणि मुलीसह ठाण्यातील नौपाडा येथील ‘संताजी शिबीर’ या चाळीत आपला संसार थाटला. ठाण्यात त्यांना कुर्ल्यातील रेशन ऑफिसमध्ये नोकरी मिळाली.
ठाण्यात आल्यावर सावळारामांनी भावगीतरचनेत रस घेण्यास सुरुवात केली. दामुअण्णा माळी यांच्या परिचयामुळे त्यांची वसंत प्रभू या संगीतकाराशी मैत्री झाली. १९४८ मध्ये ‘राघू बोले मैनेच्या कानात गं’ आणि ‘नसतं माझ्या मनात काही’ या गीतांच्या ध्वनिमुद्रिकेसह ‘सावळाराम–प्रभू’ या जोडीने मराठी भावगीतविश्वात यशस्वी पदार्पण केलं.
अर्थात, १९४९ साली आलेल्या ‘गंगा-जमुना डोळ्यांत उभ्या का?’ या अजरामर गीतामुळे सावळाराम यशाच्या शिखरावर पोहोचले. पुणे स्टेशनवर एका मुलीची पाठवणी करताना तिच्या आईच्या मुखातून उत्स्फूर्तपणे निघालेल्या शब्दांतून या गीताचा मुखडा तयार झाला. या एका गीताने सावळाराम, वसंत प्रभू आणि गायिका लता मंगेशकर या तिघांना महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचवलं. या गीताला आचार्य अत्रे आणि कुसुमाग्रज यांसारख्या दिग्गजांनीही गौरवपूर्ण दाद दिली. या यशानंतर सावळारामांनी रेशन ऑफिसमधील नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्णवेळ गीतलेखनाला प्रारंभ केला.
१९५० मध्ये ‘रामराम पाहुणं’ चित्रपटासाठी सावळारामांना चित्रगीत लिहिण्याची संधी मिळाली आणि या रौप्यमहोत्सवी ठरलेल्या चित्रपटानंतर त्यांची चित्रपट-गीतकार म्हणून प्रचंड मागणी वाढली. १९५० ते १९८० या ३० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ५२ चित्रपटांसाठी सुमारे २०० चित्रगीते रचली. सावळारामांचे कॉलेज मित्र, दिग्दर्शक दिनकर पाटील आणि माधव शिंदे यांच्याबरोबर त्यांचं मोठं सहकार्य राहिलं.
गैर-चित्रपट संगीतात सावळारामांनी अधिक यश मिळवलं. त्यांची १२५ हून अधिक गैर-चित्रपट गीतं प्रकाशित झाली. त्यात ७४ भावगीतं, १७ भक्तिगीतं, १२ गवळणी आणि १८ नाट्यसंगीत रचना अशा विविध गीतप्रकारांत त्यांनी योगदान दिलं. सावळारामांच्या यशात त्यांचे परममित्र वसंत प्रभू यांचं संगीत आणि लता–आशा तसेच संपूर्ण मंगेशकर कुटुंबाचा स्वर यांचा फार मोठा वाटा आहे.
‘जिथे सागरा धरणी मिळते’, ‘लेक लाडकी या घरची’, ‘गंगा-जमुना डोळ्यांत उभ्या का?’, ‘कोकिळ कुहुकुहु बोले’, ‘देव जरी मज कधी भेटला’, ‘रिमझिम रिमझिम पाऊस पडे’, ‘विठ्ठला समचरण तुझे धरितो’, ‘धागा धागा अखंड विणूया’, ‘जो आवडतो सर्वांना’, ‘शरण तुला भगवंता’, ‘हृदयी जागा तू अनुरागा’, ‘घट डोईवर, घट कमरेवर’ यासारखी चित्रगीतं आणि भावगीतं मराठी गीतविश्वात अजरामर झाली आहेत.
१९६० नंतर सावळाराम यांच्या जीवनात समाजकारणाची सुरुवात झाली. १९६२ मध्ये ते ठाणे नगरपालिकेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले. १९६३ साली त्यांची शिक्षण समितीचे सभापती म्हणून निवड झाली. १९६५ साली ते नगरपालिकेचे उपाध्यक्ष झाले. ३० जून १९६६ रोजी ते ठाण्याचे नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले. त्यांची ही कारकीर्द एकच वर्षाची होती, परंतु त्यांनी नगराध्यक्ष म्हणून ठाण्याचे अनेक प्रश्न मार्गी लावले आणि अत्यंत नि:स्पृहपणे काम केलं.
सावळारामांनी ‘गीतविश्वा’व्यतिरिक्त इतर साहित्यप्रकारात देखील मोलाची भर घातली. त्यांनी पाच चित्रपटांची कथा लिहिली तर ‘नांदायला जाते’ या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती देखील केली. सावळारामांनी आकाशवाणीसाठी देखील कथालेखन केलं. यामध्ये १४ लोकनाट्यं, ६ लघुनाट्यं आणि २ संगीतिका यांचा समावेश आहे. तमाशा कलावंतांविषयी त्यांना विशेष जिव्हाळा होता. १९६३ मध्ये झालेल्या तमाशा परिषदेच्या चौथ्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची एकमताने निवड झाली होती.
शिक्षणाच्या प्रसारासाठी सावळारामांनी अनेक प्रयत्न केले. ठाण्यात पहिलं महाविद्यालय (बेडेकर विद्यालय) सुरू करण्यासाठी त्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब देसाई यांच्या मदतीने नाममात्र भाड्यामध्ये जागा मिळवून दिली. तसंच, १९८० मध्ये ‘ज्ञानसाधना महाविद्यालया’च्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता आणि ते १२ वर्षे संस्थेचे उपाध्यक्ष होते. मुलुंडच्या केळकर कॉलेजच्या स्थापनेतही त्यांचा मोठा वाटा होता.
१९८० मध्ये ‘भालू’ हा चित्रपट सावळारामांचा शेवटचा चित्रपट ठरला, त्यानंतर त्यांनी गीतरचनेच्या क्षेत्रातून निवृत्ती पत्करली. निवृत्तीनंतरचा काळ सावळारामांनी ज्ञानेश्वरी वाचन, फिरणे, मित्रमंडळींशी गप्पा आणि नातवंडांसमवेत खेळण्यात घालवला. सावळारामांच्या कला-जगतात आणि संसारात त्यांच्या पत्नी सुनंदाबाई यांनी मोलाची साथ दिली. स्वतः सावळाराम, सुनंदाबाई, दोन मुली आणि दोन मुले असा त्यांचा सुखी संसार फुलाला. आयुष्यात त्यांनी काही कौटुंबिक आघातही पचवले. जावई डॉ. सुचील यांचा १९८६ मध्ये अपघाती मृत्यू झाला. या कठीण काळात त्यांनी आपल्या मुलीला मोठा मानसिक आधार दिला. उतारवयात सूनबाई गीता त्यांची काळजी घेत असत.
२१ डिसेंबर १९९७ रोजी पहाटे सहा वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पी. सावळाराम यांचं निधन झालं. त्यांच्या जीवनकार्याच्या गौरवासाठी ज्ञानसाधना महाविद्यालयाने ‘जनकवी पी. सावळाराम सांस्कृतिक सभागृह’ बांधून त्यांची स्मृती जपली आहे. सावळारामांचा देह अनंतात विलीन झाला असला तरी, जोपर्यंत मराठी भाषा आणि मराठी संस्कृती जिवंत आहे, तोपर्यंत त्यांच्या गाण्यांतून ते अमर राहतील.