कडकडुनी तू मिठी मारता बाळे। बालपण आले, आले घुमवित घुंगुरवाळे। आठवले सारे सारे गहिवरले डोळे। कढ मायेचे तुला सांगती जा… ।।
कडकडुनी तू मिठी मारता बाळे। बालपण आले, आले घुमवित घुंगुरवाळे। आठवले सारे सारे गहिवरले डोळे। कढ मायेचे तुला सांगती जा… ।।
पी. सावळाराम उर्फ निवृत्ती पाटील यांच्या आयुष्याचा पहिला टप्पा म्हणजे त्यांचं ग्रामीण आणि साधेपणानं नटलेलं बालपण. निवृत्तीचा जन्म ४ जुलै १९१४ रोजी सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी गावात त्याच्या आजोळी झाला. निवृत्तीचे वडील आबाजी पाटील, तर आई भागीरथीबाई. आबाजी (त्यांना आबा मलू असंही संबोधलं जात असे) पाटलांचं कुटुंब सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी गावचं होतं. पाटील घराणं मूळचं विदर्भातलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांच्या भाऊबंदकीतलं हे घराणं. औरंगजेबाच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांना कंटाळून पाटील घराणं सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी येथे स्थायिक झालं.
पाटील घराण्याचा संबंध एकेकाळी राजघराण्याशी असला तरी आबाजी आणि भागीरथीबाईंचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या सामान्य होतं. पत्नी भागीरथीबाई, सात मुलं आणि दोन मुली असा आबाजींचा मोठा परिवार होता. मुलांमध्ये निवृत्ती सर्वात मोठा होता, तर त्याच्यानंतर दुसरा ज्ञानेश्वर होता. याशिवाय शंकर, सीताराम, भास्कर, बाजीराव आणि पद्माकर असे सात मुलगे, तर सुलोचना आणि शकुंतला या दोन मुली. आपल्या तुटपुंज्या मिळकतीत आबाजी संसार चालवत असत.
निवृत्ती पाच वर्षांचा झाला, परंतु दुर्दैवानं त्याला देवीचा आजार झाला. त्याच्यावर ग्रामीण उपचार करण्यात आले आणि त्यातून तो बरा झाला. त्याच्या चेहऱ्यावर डाग आले, परंतु कालांतरानं ते पुसट झाले. आबाजींच्या एका चुलत्याला, रावजीला, असाध्य आजार होता. त्याला मूलबाळ नव्हतं. विनापुत्र मृत्यू नको म्हणून त्यानं निवृत्तीला दत्तक घेण्यासाठी आबाजींकडे गळ घातली आणि चुलत्याच्या प्रेमाखातर आबाजींनी ते मान्य केलं. १९२० मध्ये दत्तकविधान झालं आणि सहा वर्षांचा निवृत्ती आबाजी पाटील आता निवृत्ती रावजी पाटील झाला. दुर्दैवानं रावजींचं लवकरच निधन झालं आणि निवृत्ती आपल्या जन्मदात्या आईवडिलांकडेच वाढला.
आबाजी–भागीरथीबाई, त्यांची मुलं, आबाजींचे दोन भाऊ, नानासाहेब व ईश्वर आणि त्यांची कुटुंबं असा मोठा परिवार एकत्र राहत होता. एवढ्या मोठ्या परिवाराचा उदरनिर्वाह शेतीच्या उत्पन्नातून चालवणं शक्य नव्हतं. नानासाहेब आणि ईश्वर शेती करत, तर आबाजी तालुक्याच्या गावी नोकरी करत. शेतीचं उत्पन्न फारसं नव्हतं, त्यामुळे परिवाराचा बहुतांश आर्थिक भार आबाजी उचलत होते. आबाजी–भागीरथीबाई यांच्या सर्व मुलांचा जन्म आजोळी, येडेनिपाणीजवळ असलेल्या गोटखिंडी येथे झाला. भागीरथीबाई गोटखिंडीतील थोरात कुटुंबातल्या होत्या. आबाजींनी निवृत्तीला गोटखिंडीतील शाळेत उशिरा, म्हणजे वयाच्या आठव्या वर्षी घातलं. गोटखिंडी ते येडेनिपाणी हे अंतर तीन किलोमीटर होतं. निवृत्ती रोज तेवढं अंतर चालत शाळेत जात-येत असे.
येडेनिपाणी हे मल्लिकार्जुन डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं गाव आहे. १६७० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हे गाव वसवलं. दगडी बांधकामं, कड्यांच्या सावलीतील घरं, शेतकरी आणि गुरंढोरं यांनी गजबजलेलं असं वातावरण गावात होतं आणि त्यातच निवृत्तीचं बालपण गेलं. गावातील परंपरा, लोककला, सण, धार्मिक कार्यक्रम आणि लोकांचं साधं पण मनमोकळं आयुष्य त्याच्या मनात चिरस्थायी ठसे उमटवत गेलं.
निवृत्तीची आई भागीरथीबाई शांत, सुस्वभावी होत्या. भागीरथीबाई फारशा शिकलेल्या नव्हत्या, परंतु त्या कविता उत्तम रचत. ओव्या, भारुडे आणि अभंग त्या सहजतेनं रचत. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींनी आणि गायलेल्या ओव्यांनी निवृत्तीच्या मनात बालवयापासूनच शब्दांचं बीज रोवलं. निवृत्तीच्या मनात कवितेचा पहिला अंकुर फुटला तो आईच्या काव्यप्रतिभेतून. ती घरकाम करताना, शेतावर जाताना, मुलांना झोपवताना आणि सणासुदीच्या वेळी ओव्या आणि गीते म्हणत असे. तिच्या आवाजातील मधुर लय आणि शब्दांमधला सहज भाव निवृत्तीच्या मनात खोलवर रुजला.
निवृत्तीचं तिसरीपर्यंतचं शिक्षण गावातच झालं. शाळा साधी होती, पण शिक्षक कर्तव्यदक्ष होते. शिक्षणातली निवृत्तीची विशेष आवड लवकरच शिक्षकांच्या लक्षात आली. अक्षरओळख, कथा, गणित, कोणताही विषय असो, निवृत्ती उत्साहानं शिकत असे. वर्गात तो नियमितपणे पहिला येई. काही काळातच निवृत्ती शिक्षकांचा लाडका विद्यार्थी झाला.
गोटखिंडीसारख्या लहान गावात तीन वर्षं शिकल्यानंतर निवृत्तीची जिद्द आणि अभ्यासाची ओढ वाढतच गेली. उन्हाळ्याच्या सुट्टीतही तो शांत बसत नसे; त्याच्या मनात कायम काही ना काही शिकण्याची आस असे. वडिलांनी त्याचा हा गुण ओळखला, आणि त्याला चौथीपासून तासगावच्या शाळेत घालण्याचा निश्चय केला. आबाजी तासगावच्या शाळेतील शिंदे मास्तरांना ओळखत, त्यामुळे त्यांच्या ओळखीने निवृत्तीला तासगावच्या शाळेत पाठवण्यात आलं. हे गाव तुलनेने मोठं होतं आणि शाळा चांगली म्हणून प्रसिद्ध होती. विविधगुणी शिक्षक, भिन्न स्वभावाची मुलं, विविध उपक्रम, या साऱ्यांमुळे निवृत्तीचा आत्मविश्वास वाढला.
तासगावच्या हायस्कूलमध्ये निवृत्तीच्या जीवनात एक नवा रंग भरला, तो विठ्ठल सखाराम पागे या तेजस्वी, प्रतिभावान आणि सुसंस्कृत तरुणाच्या सान्निध्यामुळे. तासगावमध्ये राहणारा हा विठ्ठल वयाने निवृत्तीपेक्षा थोडा मोठा असला तरी दोघांची गट्टी जमली. विठ्ठलचं व्यक्तिमत्त्व असं होतं की सभोवतालचं वातावरणच भारून जाई. त्याच्या नेतृत्वगुणांमुळे आणि लोकसंग्रही स्वभावामुळे तो विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होता. विठ्ठल पागे याच्या ‘दत्तात्रय मंडळा’मुळे निवृत्तीला शिक्षणाबरोबरच व्यायाम, अध्यात्म आणि साहित्य यांची गोडी लागली. एकदा विठ्ठल काही मुलांना ह. ना. आपटे यांची ‘उषःकाल’ ही कादंबरी वाचून दाखवत होता. त्यामधील ‘सावळ्या’ या पात्राचं वर्णन वाचून विठ्ठल म्हणाला,
“अरे, हा सावळ्या तर आपल्या निवृत्तीसारखाच दिसतो. ”
आणि तेव्हापासून सारे मित्र निवृत्तीला ‘सावळ्या’ म्हणू लागले. निवृत्तीला हे नवीन नाव मनापासून भावलं. निवृत्तीच्या मनात कवितेचं बीज विठ्ठल पागेनंच पेरलं. विठ्ठल पागे याचं वृत्तांवरचं प्रभुत्व, स्वरज्ञान आणि तालाची जाण, हे सगळं निवृत्तीने डोळसपणे आत्मसात केलं. हीच शिदोरी पुढे गीतलेखनात त्याच्या उपयोगी पडली.
निवृत्तीनं तासगावच्या शाळेत चौथीत पहिला क्रमांक मिळवला. पाचवीही तो चांगल्या गुणांनी पास झाला. त्याचं हे यश पाहून आबाजींना अतिशय समाधान वाटत असे. पण घरची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत होती. तासगावची शाळा पाचवीपर्यंतच होती. पुढील शिक्षणासाठी निवृत्तीला शहराकडे पाठवणं आबाजींच्या आवाक्याबाहेरचं होतं. एक वर्ष घरी राहून, नंतर निवृत्तीला पुढील शिक्षणासाठी साताऱ्याला पाठवण्याचं आबाजींनी मान्य केलं, आणि त्या एक वर्षात निवृत्ती येडेनिपाणीलाच राहिला.
ग्रामीण जीवनाच्या साधेपणात, आईच्या काव्यमय संस्कारांत आणि कष्टाळू पण जिव्हाळ्याच्या वातावरणात वाढलेला निवृत्ती संवेदनशील मनाचा झाला. येडेनिपाणी–गोटखिंडी–तासगाव इथल्या अनुभवांनी त्याच्या शब्दांना पहिली ऊब दिली. पुढे जनकवी ‘सावळाराम’ म्हणून नावलौकिक मिळवण्याची बीजं याच बालपणी रोवली गेली.