बघुनी नभीची चंद्रकोर ती । सागरहृदयी उर्मी उठती । सुखदुःखाची जेथे सारखी । प्रीत जीवना ओढ लागते ।।
बघुनी नभीची चंद्रकोर ती । सागरहृदयी उर्मी उठती । सुखदुःखाची जेथे सारखी । प्रीत जीवना ओढ लागते ।।
१९४४ च्या अखेरीस सावळाराम व सुनंदाबाई यांनी ठाण्यात आपला संसार थाटला. सावळारामचे सासरे हरिभाऊ जाधव यांच्या ओळखीने त्यांना खापरे यांच्या मालकीच्या नौपाड्यातील ‘संताजी शिबीर’ नावाच्या चाळवजा इमारतीत एक लहानसं घर मिळालं. संताजी शिबीर—म्हणजे तीन इमारती, मध्ये प्रशस्त पटांगण आणि पटांगणाभोवती वसलेली दुकानं. वरच्या मजल्यांवर राहणाऱ्या वीस–पंचवीस कुटुंबांची घरं लहान असली, तरी त्यांची मनं मोठी होती. एकमेकांशी असलेल्या नात्यांत आपुलकी, आधार आणि प्रेम होतं.
सणसमारंभ असो, कुणाचं लग्न, बारसं की एखादा कठीण प्रसंग असो, चाळीतले सर्व लोक एकत्र जमायचे आणि उत्साहाने एकमेकांना मदत करायचे. सावळाराम–सुनंदाबाईंंचा संसारही या प्रेमळ समुदायात फुलत गेला. त्यांच्या घराचे दरवाजे शेजारपाजाऱ्यांसाठी कायम उघडे असायचे. संताजी शिबीर म्हणजे एक भलंमोठं कुटुंबच होतं. सावळाराम वाडीतली विहीर साफ ठेवणं, परिसर नीटनेटका ठेवणं यासाठी मुलांना प्रोत्साहन दिलं जात होतं आणि त्यांच्या मनात कामाची गोडी निर्माण करत, तसंच नकळत एक शिस्त, एक जाणीव रुजवली जात होती. दरवर्षी कोजागिरीच्या रात्री गच्चीवर होणारा गाण्यांचा कार्यक्रम म्हणजे संताजी शिबीरच्या चैतन्याचं एक प्रतीकच असे. चंद्रप्रकाशात गाण्यांचे सुरेल कार्यक्रम होत असत आणि त्या सांस्कृतिक सोहळ्यात सावळाराम व सुनंदाबाई दोघंही मनापासून सहभागी होत. सावळारामांचे कविता–वाचन होत असे. उपस्थितांच्या मनात त्यांच्या कविता खोलवर घर करून राहत.
त्याकाळचं ठाणे म्हणजे एक शांत, साधं आणि आपुलकीने भरलेलं खेडेगावच होतं. खाडीलगतच्या काही वाड्या — चेंदणी, कोळीवाडा, लोहार आळी, जांभळी नाका, टेंभी नाका, चरई, पाचपाखाडी आणि नौपाडा — एवढंच होतं ते ‘जुनं ठाणं’. संपूर्ण शहर जेमतेम पंचवीस हजार माणसांचं होतं. टांगे होते खरे, पण लोकांचं रोजचं जीवन पावलांवरच अवलंबून असायचं. संताजी शिबीर ते ठाणे स्टेशन हा आठ-दहा मिनिटांचा पायी प्रवास अनेकांचा दैनंदिन अनुभव असे. त्या रस्त्यांवर डांबर नव्हतं, तर मुरुमाच्या खडीचे खडबडीत मार्ग होते. घरं बहुतेक कौलारू होती. संध्याकाळी सातच्या सुमारासच शहर जणू निजायला लागायचं. रस्ते ओस पडत. दूर जंगलातून कोल्ह्यांचे आवाज कानावर पडत.
सावळारामांना कुर्ल्यामधील रेशन ऑफिसमध्ये नोकरी मिळाली. नोकरीसाठी रोजचा ठाणे–कुर्ला–ठाणे प्रवास, रेशन ऑफिसमधील १० ते ५ या वेळेतील नोकरी, अशी सावळारामांची दिनचर्या सुरू झाली. सावळाराम आणि सुनंदाताईंचं आयुष्य सुरळीत सुरू होतं. ठाण्याला आल्यानंतर तीन वर्षांनी, म्हणजे १४ फेब्रुवारी १९४७ मध्ये दाम्पत्याला दुसरं कन्यारत्न प्राप्त झालं. तिचं नाव कल्पना ठेवण्यात आलं.
सर्व काही आनंदात चालू होतं, परंतु सामान्य आयुष्य जगण्यासाठी सावळारामांचा जन्म झालेला नव्हता. त्यांची कवितेच्या विश्वाची ओढ कायम होती. रिकाम्या वेळेत, आजवर कोल्हापूर, सातारा, बेळगाव आणि ठाणे या वास्तव्यात लिहिलेल्या कवितांच्या हस्तलिखितांचा संग्रह त्यांनी तयार केला. कवितांच्या खाली आपले ‘सावळाराम’ हे नाव आणि तारीख ते अभिमानाने लिहायचे. हा संग्रह तयार करण्यासाठी सुनंदाबाईंनीदेखील त्यांना मदत केली. कवितासंग्रहाला त्यांनी ‘जयजयवंती’ असे शीर्षक दिले. हा कवितासंग्रह त्यांनी प्रकाशित केला नव्हता, पण काव्यप्रेमींना ते आवर्जून दाखवत. त्यातल्या काही कविता नंतर त्यांनी गीतांच्या स्वरूपात प्रसिद्धही केल्या.
या काळात सावळारामांच्या काव्यलिखाणात मात्र बदल घडून आला. कवितेच्या रचनेतून काहीसे बाहेर पडून, सावळाराम भावगीतरचनेत रस घेऊ लागले. सावळारामांच्या मते, ‘जातीवृत्त जपून, शब्दांची सालंकृत योजना करण्यात आणि यमकांसाठी यमक जुळवण्यात कवी कवितालेखनात रमतो; मात्र या प्रयत्नात लिहिण्यामधील ‘भावना’ उगीचच अडकवून ठेवली जाते.’ कविता आणि भावगीत यांमधला फरक सांगताना सावळाराम म्हणत – ‘भावगीत हे भावनेशी जवळीक साधते, तर कविता थोडी दूर राहते.’ उदाहरण द्यायचं तर – ‘माते, मज भोजन दे,’ ही कविता आहे; तर ‘आई, मला वाढ,’ हे भावगीत आहे.
याच दरम्यान, सावळारामांची दामुअण्णा माळी यांच्याशी ओळख झाली. दामुअण्णा माळी हे उत्तम भजनी गायक होते. गीते लिहिण्याचा त्यांना छंद होता. हाच समान धागा दोघांना एकत्र आणणारा ठरला. गीतलेखनाच्या सामायिक छंदाने दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. दामुअण्णा दादरमध्ये वास्तव्यास होते. तिथे त्यांच्या काही निवडक मित्रांचा समूह होता. रोज संध्याकाळी हे सर्वजण एकत्र येत, गाणी लिहीत, चाली लावत, संगीतावर चर्चा करत, अशी संध्याकाळ रंगत असे. सावळारामही या मैफिलीत जाऊ लागले. कुर्ल्याच्या रेशन ऑफिसमधील आपले काम संपवून ते सरळ दादरला पोहोचत.
या मंडळींमध्ये एक महत्त्वाचं नाव होतं — वसंत प्रभू. ते त्या काळात एचएमव्ही (HMV) कंपनीत संगीतकार म्हणून काम करत होते. त्यांची आणि सावळाराम यांची याच काळात घट्ट मैत्री झाली. वसंत प्रभू हे सावळाराम यांच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान होते. त्यामुळे सावळाराम त्यांना कधी ‘अरे प्रभू’, तर कधी ‘वसंता’ अशा अनौपचारिक प्रकारे संबोधत. पण वसंत प्रभू मात्र सावळाराम यांना नेहमी आदराने ‘अहो सावळाराम’ असे म्हणत. ही जोडी पुढे मराठी भावगीतांच्या इतिहासात अढळ स्थान मिळवणार आहे, याची चाहूलही त्यांना त्यावेळी नव्हती.
सावळाराम आणि वसंत प्रभू दोघे अनेकदा एकत्र येऊन काव्य आणि संगीत यांची देवाणघेवाण करत. एके दिवशी सावळारामांनी एक गीत तयार केलं आणि वसंत प्रभूंना दाखवलं. प्रभूंनी ते वाचलं आणि तिथेच त्याला चाल लावली. ते गीत होतं — ‘राघू बोले मैनेच्या कानात गं, चल सखे आंब्याच्या वनात गं.’ या गाण्याची रेकॉर्ड तयार करण्याची कल्पना दोघांच्या मनात आली. रेकॉर्ड करण्यासाठी दोन गाण्यांची आवश्यकता होती. सावळारामांच्या प्रतिभेसाठी हे फारसं अवघड नव्हतं. त्यांनी लगेच दुसरं गाणं लिहून काढलं आणि प्रभूंनी त्यालाही चाल दिली. ते गाणं होतं — ‘नसता माझ्या मनात काही, पाठलाग हा उगाच बाई.’
प्रभू एचएमव्ही (HMV) मध्येच काम करत होते. कंपनीमध्ये वसंत करमरकर ध्वनिमुद्रण अधिकारी म्हणून कार्यरत होते. सावळाराम–प्रभू जोडीने करमरकरांना दोन्ही गाणी ऐकवली आणि ती त्यांना प्रथमदर्शनीच आवडली. रेकॉर्डिंग करायचं ठरलं. गायक म्हणून नलिनी मुळगावकर यांची निवड करण्यात आली. ध्वनिमुद्रिका तयार झाली आणि गाणी इतकी लोकप्रिय झाली की सगळीकडे त्यांची चर्चा होऊ लागली.
या अपूर्व यशामुळे ‘सावळाराम–प्रभू’ या जोडीच्या आत्मविश्वासाला नवे पंख फुटले. रसिकांच्या उदंड प्रतिसादामुळे त्यांचा उत्साह आणखीनच वाढला. पुढच्याच महिन्यात नलिनी मुळगावकरच्या आवाजात आणखी एक ध्वनिमुद्रिका बाजारात आली. ती गाणी होती — ‘मी हसले, मनी रमले’ आणि ‘थांब ना सख्या, तू जरासा.’ ही गाणीही प्रचंड गाजली.
१९४८ मध्ये आलेल्या या ध्वनिमुद्रिका म्हणजे ‘सावळाराम–प्रभू’ जोडीच्या अजरामर गीतांच्या सुवर्णकाळाची नांदी होय.