वेचित वाळूत शंख शिंपले । रम्य बाल्य ते जिथे खेळले । खेळाचा उल्हास रंगात येउनी । धुंदीत यौवन जिथे डोलते ।।
वेचित वाळूत शंख शिंपले । रम्य बाल्य ते जिथे खेळले । खेळाचा उल्हास रंगात येउनी । धुंदीत यौवन जिथे डोलते ।।
१९३७ ते १९४१ हा राजाराम कॉलेजचा काळ सावळारामसाठी आनंददायी आणि फलदायी ठरला. दुर्दैवानं निवृत्तीच्या शिक्षणात त्याची आर्थिक परिस्थिती पुन्हा आडवी आली. आवश्यक अर्थार्जन करून मगच राजाराम कॉलेजमधील शेवटचं वर्ष पूर्ण करण्याचा निर्णय त्यानं घेतला. १९४१ मध्ये ज्युनियर बी.ए.ची परीक्षा दिल्यानंतर, घरच्या परिस्थितीमुळे सावळारामनं वर्षभरासाठी राजाराम कॉलेज सोडून साताऱ्याच्या सरकारी हायस्कूलात शिक्षकाची नोकरी स्वीकारली. पदवीपरीक्षेचं शेवटचं वर्ष बाकी असताना सावळारामच्या शिक्षणात पुन्हा खंड पडला.
साताऱ्याचं सरकारी हायस्कूल सावळारामला नवीन नव्हतं. सहावीच्या इयत्तेतलं त्याचं एका वर्षाचं शिक्षण याच शाळेत झालं होतं. इंग्रजी आणि इतिहास या दोन विषयांचा शिक्षक म्हणून त्याने आपलं काम सुरू केलं. शाळेमध्ये विनायक जाधव नावाचा एक तरुण शिक्षक होता. तोही मिरजेहून नोकरीनिमित्त साताऱ्यात आला होता. विनायक सावळारामपेक्षा दोन वर्षांनी लहान होता, परंतु त्यांची चांगली गट्टी जमली. शाळेजवळच दोघांनी मिळून एक खोली घेतली आणि एकत्र राहू लागले. सावळारामला शिक्षकी पेशाचा अनुभव होताच; कोल्हापुरातील शिवाजी विद्यालयात त्यानं दोन वर्षं शिक्षकाची नोकरी केली होती. त्यामुळे सावळाराम शिक्षकाच्या नव्या भूमिकेत लवकरच रुळला.
विनायकाबरोबरची मैत्री पुढील आयुष्यात एक प्रेमाचं नातं निर्माण करणारी ठरली. १९४२ च्या मार्च महिन्यात विनायकाची लहान बहीण कृष्णा साताऱ्याला मॅट्रिकची परीक्षा द्यायला आली. त्या काळी लहान गावांमध्ये शिक्षणाच्या सोयी कमी प्रमाणात उपलब्ध होत्या; त्यामुळे मॅट्रिकची अंतिम परीक्षा द्यायला विद्यार्थ्यांना साताऱ्याला जावं लागत असे. कृष्णाबरोबर तिची लग्न झालेली थोरली बहीण वासंती देखील सोबतीला साताऱ्याला आली होती. दोघींचा साताऱ्यात चार–पाच दिवसांचा मुक्काम झाला.
या काळात सावळारामची विनायकाच्या दोन्ही बहिणींशी ओळख झाली. थोरली वासंतीला सावळाराम आपली लहान बहीण कृष्णासाठी जोडीदार म्हणून योग्य वाटला. वासंतीने सावळारामला याबाबत विचारणा केली. सावळारामाला आधीच कृष्णाबद्दल आकर्षण निर्माण झालं होतं, त्यामुळे त्याने आनंदानं होकार दिला. अर्थात, दोन्ही बाजूंनी आपापल्या घरी विचारणा करून मगच लग्न ठरवायचं असं ठरलं. सावळारामचं बी.ए.चं एक वर्ष शिल्लक होतं; ते पूर्ण झाल्यानंतरच लग्न करायचं असंही निश्चित झालं.
वासंती मिरजेला जाऊन आईवडिलांना घडलेला प्रकार सांगून आली आणि जाधव कुटुंबाला हे लग्न सहज मान्य झालं. सावळारामनंही येडेनिपाणीला आपल्या घरी आई–वडिलांना या लग्नाबद्दल सांगितलं. आबाजींना मात्र ते विशेष आवडलं नाही; जाधव घराणं पाटील घराण्याच्या तोलामोलाचं नाही, असं त्यांचं मत पडलं. परंतु सावळाराम आपल्या निश्चयावर ठाम होता. कृष्णाशीच लग्न करण्याचा आपला निर्धार त्यानं धरून ठेवला.
एक वर्ष साताऱ्याच्या शाळेत काम करून, राहिलेल्या एक वर्षाच्या शिक्षणाची बेगमी सावळारामनं केली आणि वर्षाअखेर आपला राजीनामा शाळेला सादर केला. १९४२ मध्ये त्यानं कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षासाठी पुन्हा प्रवेश घेतला. राजाराम कॉलेजमध्ये तो पुन्हा अभ्यासात आणि साहित्यिक जीवनात मग्न झाला. राजाराम कॉलेजमधूनच पास झालेल्या व्यं. न. कुलकर्णी यांनी कोल्हापूरमध्ये ‘महाद्वार’ नावाचं मासिक सुरू केलं होतं, त्यात सावळाराम आपल्या कविता प्रसिद्ध करू लागला. याच काळात ‘महाद्वार’च्या अनुषंगानं सावळारामची ओळख ग. दि. माडगूळकर या नवोदित कवीशी झाली. माडगूळकर एक गुणी कवी म्हणून उदयाला येऊ लागले होते. सावळाराम व माडगूळकर एकमेकांना आदरानं वागवीत असत.
पाहता पाहता वर्ष निघून गेलं. १९४३ मध्ये सावळारामनं बी.ए.ची परीक्षा दिली आणि तो त्यात उत्तीर्ण झाला. मात्र बी.ए.ला ‘ऑनर्स’ मिळालं नाही, याची त्याला खंत राहिली.
सावळारामचं आणि कृष्णाचं लग्न जुळून एक वर्ष उलटलं होतं. कृष्णाचे वडील हरिभाऊ जाधव सावळारामला लग्नाची घाई करू लागले. सावळारामच्या अटीप्रमाणे त्याचं बी.ए. पूर्ण झालं होतं, त्यामुळे अजून दिरंगाई करण्याचं त्यालाही कारण नव्हतं. ७ मे १९४३ रोजी कोल्हापूरमधल्या राधाकृष्ण मंदिरात एका छोटेखानी समारंभात सावळाराम आणि कृष्णा यांचा विवाह संपन्न झाला. लग्नात जाधव कुटुंबातील मंडळी जातीने हजर होती. आबाजी आणि भागीरथीबाई लग्नाला उपस्थित राहिले नाहीत; मात्र धाकटी भावंडं लग्नात उपस्थित होती.
सावळारामच्या कवी मित्रांनी लग्नासाठी सुरेख मंगलाष्टकं रचली आणि काही हितचिंतकांनी आशीर्वादपर कविता रचल्या. कविमनाच्या व्यक्तीला साजेसा असा लग्नसमारंभ पार पडला. लग्नानंतर सावळारामनं कृष्णाचं नाव बदलून ‘सुनंदा’ ठेवलं. लग्नसमारंभ आटोपल्यानंतर सावळाराम सुनंदाला घेऊन येडेनिपाणीला आला. आबाजींना हे लग्न पसंत नसलं, तरी त्यांनी आणि भागीरथीबाईंनी दोघांनाही प्रेमानं स्वीकारलं. अशा रीतीनं सावळाराम–सुनंदाचा संसार सुरू झाला.
संसार चालवण्यासाठी सावळारामला अर्थार्जन आवश्यक होतं. त्याला शिक्षकी पेशाचा चांगला अनुभव होता, म्हणून त्यानं हाच मार्ग निवडण्याचं ठरवलं. त्या काळी शिक्षकांसाठी बी.टी. नावाची पदव्युत्तर परीक्षा असायची. कायमस्वरूपी नोकरी सुरू करण्याआधी ही परीक्षा देण्याचा विचार सावळारामनं केला. बेळगावमध्ये बी.टी.चा कोर्स उपलब्ध होता, तो पूर्ण करण्याचा त्यानं निश्चय केला. १९४३ मध्ये सुनंदाला येडेनिपाणीला घरी ठेवून, सावळाराम पुढील शिक्षणासाठी बेळगावला गेला. बेळगावमध्ये एकट्यासाठी राहण्याची व्यवस्था करून त्यानं बी.टी.चा अभ्यास सुरू केला.
बेळगावमध्ये अभ्यासाबरोबरच सावळाराम आपल्या कविताविश्वात पुन्हा शिरला. कोल्हापूरमधल्या राजाराम कॉलेजमधील त्याचे काही कवी मित्र बेळगावमध्ये स्थायिक झाले होते, त्यांच्यासोबत त्यानं आपली कवितेची तपस्या चालू ठेवली. सावळारामनं बेळगावमध्ये शिक्षण सुरू केलं खरं, परंतु कुटुंबाच्या जबाबदारीमुळे त्याला वारंवार येडेनिपाणीला यावं लागत होतं. यामुळे शिक्षणात व्यत्यय येत होता. अखेर, एक वर्षानंतर १९४४ मध्ये हा उपक्रम अर्धवट सोडून, येडेनिपाणीला परत जाण्याचा निर्णय त्यानं घेतला.
याच काळात कुटुंबात आणखी एक चिंतेचा विषय उभा राहिला. आबाजींनी सावळारामचा धाकटा भाऊ हिंदुराव याचं लग्न लावून दिलं आणि त्याला तालुक्याच्या शहरात नोकरी लावून दिली. पण नोकरीत रस नसल्यामुळे त्यानं ती सोडली आणि तो स्वातंत्र्य चळवळीत सामील झाला. १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात तो वसंतदादा पाटलांसोबत भूमिगत झाला. त्यानं बँक लुटणं, शस्त्रसाठा करणं, पूल उडवणं यांसारख्या क्रांतिकारी कारवायांमध्ये भाग घेतला. त्यात त्याला अटक झाली. १९४३ मध्ये सांगली तुरुंग फोडून काही क्रांतिकारक पळाले, त्यात हिंदुराव होता; मात्र तो पुन्हा पकडला गेला. त्याच्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याला १२ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.
या गडबडीच्या काळात एक आनंदाची गोष्ट म्हणजे सुनंदा याच काळात गरोदर राहिली. २४ जुलै १९४४ रोजी सुनंदाच्या माहेरी, कागल येथे, सावळाराम–सुनंदा यांचं कन्यारत्न जन्माला आलं. दाम्पत्यानं मुलीचं नाव ‘प्रतिभा’ ठेवलं. सावळारामचा संसार वाढत होता. संसार चालवण्यासाठी अर्थार्जनाची आवश्यकता होती. येडेनिपाणीमध्ये शेती करण्यात त्याला रस नव्हता. मुंबई–पुण्याकडे जाऊन आपलं नशीब अजमावण्याचा विचार त्याच्या मनात घोळू लागला. त्यानं हा विचार आपल्या सासऱ्यांना – हरिभाऊ जाधव यांना बोलून दाखवला. हरिभाऊंचे एक मित्र, संताजी खापरे, धनाढ्य होते. ठाण्यामध्ये गोखले रोडवर त्यांच्या मालकीची एक चाळ होती. खापरे यांनी सावळारामला तिथं राहावयास जागा उपलब्ध करून दिली.
१९४४ साली सावळाराम व सुनंदा नव्या आयुष्याच्या उंबरठ्यावर उभे होते. आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन ठाण्यात पाऊल ठेवताना त्यांच्या मनात काळजीपेक्षा धैर्य अधिक होतं. संसाराचा भार होता, पण त्याहून मोठी होती काहीतरी साध्य करण्याची जिद्द. हा प्रवास त्यांना कुठे नेईल हे माहीत नव्हतं; पण एवढं मात्र नक्की — दोघेही त्या प्रवासासाठी तयार होते.