जिथे सागरा धरणी मिळते । तिथे तुझी मी वाट पाहते ।।
जिथे सागरा धरणी मिळते । तिथे तुझी मी वाट पाहते ।।
आबाजींनी निवृत्तीला दिलेलं वचन पूर्ण केलं. वर्षभर त्याच्या शिक्षणासाठी पैसे जमा करून, १९२९ मध्ये ठरल्याप्रमाणे त्याचा दाखला साताऱ्याच्या ‘सरकारी शाळेत’ घेतला. निवृत्तीच्या साताऱ्यातील वर्षभराच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करून दिली. साताऱ्यातील ‘सरकारी हायस्कूल’ हे शहरातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातीलही आद्य शैक्षणिक उपक्रमांपैकी एक होतं. या शाळेची स्थापना १८२१ साली साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी केली होती.
त्या काळात पुणे आणि मुंबईत काही शाळा सुरू होऊ लागल्या होत्या; परंतु भारतीय संस्थानांमध्ये अशा उपक्रमांचा अभाव होता. त्या पार्श्वभूमीवर प्रतापसिंह महाराजांनी केलेली ही स्थापना दूरदृष्टीचं दर्शन घडवणारी होती. प्रतापसिंह महाराजांना शिक्षणाचा विशेष आग्रह होता, मराठी प्रशासन अधिक सक्षम व्हावं, नवे अधिकारी तयार व्हावेत आणि प्रजेला आधुनिक ज्ञानाशी परिचय व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. अनेक जिल्ह्यांतील विद्यार्थी साताऱ्यात येऊन शिक्षण घेऊ लागले आणि ही शाळा सातारा संस्थानाच्या शैक्षणिक धोरणाचा केंद्रबिंदू मानली जाऊ लागली.
निवृत्तीने साताऱ्याच्या सरकारी शाळेत प्रवेश घेतला तेव्हा बा. ना. वगळे हे शाळेचे मुख्याध्यापक होते, तर नाडकर्णी सर निवृत्तीचे वर्गशिक्षक होते. तासगावच्या शाळेत विठ्ठल पागे याच्या प्रेरणेने निवृत्तीने कवितालेखन सुरू केलं होतं. साताऱ्यात आल्यावर निवृत्तीच्या कवितालेखनाला अधिक वेग आला. साताऱ्याच्या शाळेत त्याची मैत्री व. वा. इनामदार या विद्यार्थ्याशी झाली. निवृत्ती आपल्या कविता इनामदारला आवर्जून ऐकवत असे.
साताऱ्याच्या शाळेत राहण्याचं भाग्य निवृत्तीला फार काळ मिळालं नाही. वडिलांनी एका वर्षाच्या खर्चाची तरतूद करून ठेवली होती, पण त्यानंतर पुन्हा वडिलांकडे पैसे मागणं निवृत्तीला प्रशस्त वाटलं नाही. त्या काळात कोल्हापूर संस्थानात शाहू महाराजांनी गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनेक सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या, त्यामुळे निवृत्तीने आपला मोर्चा कोल्हापूरकडे वळवला. १९३० मध्ये त्याने कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये सातव्या वर्गात प्रवेश घेतला. एका लहानशा खोलीत राहून, गरीब विद्यार्थ्यांसाठी चालवलेल्या खाणावळीत जेवून, मोठ्या कष्टाने त्याने कोल्हापूरमध्ये आपलं शिक्षण सुरू ठेवलं. पुढे दादासाहेब निंबाळकर यांच्यासारख्या दानशूर व्यक्तीने निवृत्तीला मदत केली आणि त्याच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करून दिली.
निवृत्ती नवीन शाळेत रुळला आणि कोल्हापूरमधील मंगल, कलात्मक वातावरणात त्याचं मन आकार घेऊ लागलं. महालक्ष्मीच्या मंदिरातील घंटानाद आणि काकडआरतीनं कोल्हापूरमधील दिवस सुरू होई. प्रत्येक घरासमोर गृहिणी सडा–मार्जन करून रांगोळ्या घालत. घरोघरी गायलं जाणारं शास्त्रीय संगीत, ओव्या आणि भूपाळ्या निवृत्तीच्या कानावर पडत. कोल्हापूरमध्ये आखाडे आणि कुस्ती यांना फार मोठा मान होता. तरुण मुलं आखाड्यात जाऊन कुस्ती आणि व्यायाम करून दिवसाची सुरुवात करत. संध्याकाळी देवळात नियमितपणे कथा–कीर्तन आणि आरत्या होत. अशा बहुरंगी, बहुढंगी वातावरणात निवृत्तीचं मन आणि शरीर विकसित होत होतं.
निवृत्ती अभ्यासात हुशार होता. आपल्या कवितांचा आणि इतर वाचनाचा छंद जोपासून तो अभ्यासाला पुरेसा वेळ देत असे. घरची परिस्थिती सामान्य असल्याने घरून आर्थिक मदतीची त्याला अपेक्षा नव्हती; त्यामुळे आपलं दैनंदिन जीवन अतिशय काटकसरीनं व्यतीत करण्याचा समजूतदारपणा त्याच्यात होता. १९३० ते १९३५ या काळात निवृत्तीने राजाराम हायस्कूलमध्ये आपलं शालेय शिक्षण नेटानं पूर्ण केलं आणि १९३५ मध्ये मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरित्या पास झाला.
निवृत्तीला महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची खूप इच्छा होती, परंतु घराच्या सामान्य आर्थिक परिस्थितीमुळे त्याला ते शक्य नव्हतं. याच सुमारास त्याचा धाकटा भाऊ सीताराम कोल्हापूरला शिकायला आला आणि त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेणंही निवृत्तीला आवश्यक वाटलं. परिस्थितीचा सारासार विचार करून त्यानं काही काळ शिक्षण थांबवून, पुढील शिक्षणासाठी पैसे जमा करावेत असा विचार केला. त्याच सुमारास कोल्हापूरमध्येच ‘प्रिन्स शिवाजी विद्यालयात’ शिक्षकाची जागा रिकामी होती, निवृत्तीने तेथे शिक्षकाची नोकरी पत्करली. सीतारामलाही त्याच विद्यालयात विद्यार्थी म्हणून प्रवेश घेऊन दिला.
छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये हे प्रिन्स शिवाजी विद्यालय स्थापन केलं होतं. ते दूरदृष्टीचे, समाजपरिवर्तनवादी राजे होते. शिक्षण सर्वांसाठी असावं, असं मानून त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं आणि मागासवर्गीयांसाठी आरक्षण लागू केलं. धर्म–जातीपलीकडे जाऊन शिक्षण दिलं पाहिजे, असा त्यांचा विश्वास होता. शिक्षणानंच सर्वांगीण विकास आणि लोकशाही समाज घडतो, हे त्यांनी ओळखलं होतं.
१९३५ ते १९३७ या दोन वर्षांत निवृत्तीने प्रिन्स शिवाजी विद्यालयात शिक्षक म्हणून काम केलं. या काळात त्याने घरची जबाबदारी सांभाळली, पुढील शिक्षणाची तजवीज केली आणि स्वतःला अधिक सक्षम बनवलं. याच काळात त्याचं मन आतून परिपक्व होत गेलं. संघर्ष, जिद्द, स्वावलंबन आणि साहित्याची ओढ, या सगळ्यांनी त्याच्यात एक नवं बळ निर्माण केलं. महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची त्याची इच्छा पूर्वीपेक्षा अधिक तीव्र झाली. आता तो केवळ विद्यार्थी नव्हता, तर स्वतःचा मार्ग स्वतः तयार करणारा युवक झाला होता. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करताना त्याला कवितेच्या विश्वात स्वतःची ओळख निर्माण करायची होती.