डोंगरदरीचे सोडून घर ते । पल्लव पाचूचे तोडून नाते । हर्षाचा जल्लोष करुनी जेथे । प्रीत नदी एकरूपते ।।
डोंगरदरीचे सोडून घर ते । पल्लव पाचूचे तोडून नाते । हर्षाचा जल्लोष करुनी जेथे । प्रीत नदी एकरूपते ।।
१९३७ मध्ये निवृत्तीने कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. देखण्या राजवाड्यात वसलेली ही भव्य वास्तू, तिचा परिसर आणि वातावरण मंत्रमुग्ध करणारं होतं. राजेशाही इतिहासाची जाणीव करून देणारी ही वास्तू होती. जवळच असलेलं भवानी मंदिर, चहुकडची हिरवळ आणि जागोजागी उभारलेली कारंजी यामुळे वातावरण अत्यंत उत्साहवर्धक वाटत असे. या वास्तूला अधिक शान आली होती ती तेथील द्रष्ट्या प्राध्यापकांमुळे; या प्राध्यापकांनी राजाराम कॉलेजला एका ज्ञानपीठाचं स्वरूप प्राप्त करून दिलं होतं. निवृत्ती प्रथमदर्शनीच राजाराम कॉलेजच्या प्रेमात पडला.
कोणत्याही महान संस्थेची खरी ओळख तिच्या भव्य इमारतींपेक्षा तेथील माणसं घडवणाऱ्या व्यक्तींमुळेच ठरते. राजाराम कॉलेजला मुंबई राज्यातील प्रथम श्रेणीचं महाविद्यालय बनवण्यामध्ये प्राचार्य डॉ. बाळकृष्ण आणि तेथे प्रेरणास्थान मानल्या जाणाऱ्या प्राध्यापक त्रयीचा सिंहाचा वाटा होता. त्यांचं ज्ञान, प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि प्रभावशाली अध्यापनशैलीनं हजारो विद्यार्थ्यांना आकर्षित केलं आणि त्यांच्या जीवनाला दिशा दिली.
निवृत्तीने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तेव्हा डॉ. बाळकृष्ण प्राचार्य होते. पंजाबी, बहुभाषिक आणि राष्ट्रीय दृष्टिकोन असलेला मुलतानचा हा विद्वान राजाराम कॉलेजसाठी भाग्य मानला जात असे. इंग्रजी, हिंदी, मराठी भाषांवर प्रभुत्व आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्वामुळे ते विद्यार्थ्यांना भारावून टाकत. ते फक्त प्रशासक नव्हते, तर विद्यार्थ्यांचे प्रिय मार्गदर्शक होते. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये इतिहास, संस्कृती आणि राष्ट्रप्रेम रुजवण्याचा प्रयत्न केला. ‘शिवाजी द ग्रेट’ या त्यांच्या प्रबंधासाठी त्यांनी देशभर संशोधन केलं. शिस्तप्रिय, प्रेमळ आणि प्राध्यापकांना प्रोत्साहन देणारे असं त्यांचं नेतृत्वच कॉलेजची ओळख ठरलं. त्यांच्या प्रभावामुळेच राजाराम कॉलेज राज्यातील एक ख्यातनाम संस्था बनलं.
राजाराम कॉलेजच्या तीन प्रेरणास्थानांपैकी पहिले होते कॉलेजचे प्राध्यापक ना. सी. फडके. तर्कशास्त्राचे शिक्षक असूनही फडके खरे कलावंत होते. त्यांची शिकवण्याची रसाळ शैली, विनोदी उदाहरणं आणि प्रभावी भाषा यामुळे अनेक विद्यार्थी फक्त त्यांच्या आकर्षणामुळे हा विषय निवडत. फडके स्वतः नावाजलेले कादंबरीकार होते आणि त्यांच्या लिखाणानं वाचक मंत्रमुग्ध होत असत. त्यांनी स्थापलेलं ‘कलामंडळ’ हे कॉलेजच्या सांस्कृतिक जीवनाचं केंद्र होतं. संगीत, नाटकं आणि क्रीडाप्रेमातून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये कलात्मकता आणि खिलाडूपणा रुजवला. फडक्यांच्या ‘कलामंडळा’त निवृत्तीने सक्रिय सहभाग घेतला.
कॉलेजचं दुसरं श्रद्धास्थान म्हणजे प्रा. माधवराव पटवर्धन. माधवराव ‘माधव जुलियन’ या नावाने सर्वपरिचित होते. माधव जुलियन केवळ एक कर्तबगार शिक्षकच नव्हते, तर प्रतिभावंत कवीही होते, नवोदित कवींना प्रेरणा देणारे गुरू होते. ते विद्यार्थ्यांना कविता करून आणायला सांगत आणि आवडल्यास त्यांच्या कवितेचं जाहीर कौतुक करत.
माधव जुलियन यांचं व्यक्तिमत्त्व तत्त्वनिष्ठ आणि स्वाभिमानी होतं. ते मराठी साहित्यातील नाजूक, भावस्पर्शी प्रेमकाव्याचे कवी होते. त्यांच्या कवितांमध्ये कोमल भावना, संवेदनशील शब्द आणि गेय लय असायची. वारा, फुलं, चांदणं, पाऊस या नैसर्गिक प्रतिमांनी त्यांच्या कवितेला हृदयस्पर्शी रूप मिळायचं. माधव जुलियन यांच्या व्यक्तिमत्त्वानं आणि प्रतिभेनं निवृत्ती संपूर्ण भारावून गेला. त्यानं माधव जुलियन यांना मनोमन आपले गुरू मानलं.
कॉलेजचं तिसरं प्रेरणास्थान म्हणजे प्राध्यापक द. सी. पंगू. पंगू सर मराठीचे प्राध्यापक होते. त्यांचा मराठी साहित्याचा फार मोठा व्यासंग होता. ते तल्लीन होऊन विद्यार्थ्यांना मराठी शिकवत आणि त्यांच्याशी तासन् तास साहित्यावर चर्चा करत. मात्र पंगू सर अतिशय फटकळ स्वभावाचे होते. एखाद्या विद्यार्थ्याने सुमार कविता केली आणि ती त्यांना वाचून दाखवली, तर पंगू सर त्या विद्यार्थ्याला आपली स्पष्ट नापसंती व्यक्त करत. निवृत्तीची भाषा समृद्ध करण्यात पंगू सरांचा देखील महत्त्वाचा वाटा होता.
राजाराम कॉलेजच्या त्या वाङ्मयीन वातावरणात निवृत्ती पूर्णपणे समरस झाला. तो कॉलेजच्या नियतकालिकांमधून आपल्या कविता प्रकाशित करू लागला. कॉलेजच्या वार्षिक संमेलनातही सहभागी होऊ लागला आणि फडके सरांच्या कलामंडळातही सक्रिय भाग घेऊ लागला. कॉलेजात कलामंडळासोबतच ‘मराठी वाङ्मय विहार मंडळ’ही होतं; यात साहित्यिक चर्चा चालायच्या, आणि निवृत्ती त्यात आवडीने भाग घेत असे. दिनकर पाटील, विप्लवी चामुंडराय यांसारख्या साहित्यप्रेमी विद्यार्थ्यांबरोबर निवृत्तीची येथेच मैत्री झाली. दिनकर पाटील ‘राजारामियन’ नियतकालिकाचा संपादक होता, निवृत्तीचाही त्यात सक्रिय सहभाग राहू लागला. ‘राजारामियन’च्या काही अंकांचं संपादनही निवृत्तीने केलं.
माधव जुलियन यांना तर त्यानं गुरूच मानलं होतं. आपल्या सर्व कविता तो त्यांना आणून दाखवत असे आणि त्यांचा अभिप्राय घेत असे. माधव जुलियन यांचा त्याच्या काव्यशक्तीवर अपूर्व असा प्रभाव पडला. त्यांनी निवृत्तीच्या काव्यप्रतिभेला दिशा दिली, शब्दसंपदा वाढवली आणि त्याला काव्यातील सौंदर्यदृष्टी दिली. माधव जुलियन, ना. सी. फडके आणि पंगू यांचा निवृत्तीच्या व्यक्तिमत्त्वावर आणि लिहिण्याच्या पद्धतीवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडला. या त्रयीच्या मार्गदर्शनामुळे निवृत्तीची भाषा शुद्ध, भावनापूर्ण आणि छंदोबद्ध झाली.
राजाराम कॉलेजमध्ये ‘मराठी वाङ्मय विकास मंडळ’ हा विद्यार्थ्यांच्या साहित्यिक प्रतिभेला आविष्कार देणारा मुख्य मंच होता. या मंडळात साहित्य, नाटक, कविता, गद्य, चर्चा, वाचन यांचे नियमित कार्यक्रम होत. तरुण विद्यार्थ्यांची भाषिक जाण वाढवणं, समकालीन मराठी साहित्याची ओळख करून देणं आणि स्वबळावर लिहिण्याचं धाडस निर्माण करणं हे मंडळाचं उद्दिष्ट होतं. मंडळात त्या काळातील रसिक, अभ्यासू आणि साहित्यप्रेमी विद्यार्थी एकत्र येत असत आणि चर्चा अत्यंत गंभीर पण मैत्रीपूर्ण वातावरणात होत.
मराठी वाङ्मयातील नव्या प्रवाहांवर बोलणं, नवे कवी–लेखक वाचणं, त्यांच्या कलाकृतींचा आस्वाद घेणं, या उपक्रमांनी अनेक तरुणांची दृष्टी खुली झाली. मंडळानं आयोजित केलेल्या विशेष बैठकींना बाहेरील साहित्यिकांनाही निमंत्रित केलं जाई आणि अशा सत्रांमधून विद्यार्थ्यांच्या लेखनाला नवी दिशा मिळत असे. या वातावरणात निवृत्तीची काव्यदृष्टी तर वाढलीच, पण साहित्यावरील प्रेम अधिक दृढ झालं. चर्चेतून विचारांची स्पष्टता, लेखनातील नेटक्या रचनेचं महत्त्व आणि भाषेचं सौंदर्य यांचं भान त्याला मिळालं.
राजाराम कॉलेजचा ‘बोट क्लब’ हे एक खास वैशिष्ट्य होतं. पंचगंगा नदीत बोटीतून, खास करून चांदण्या रात्री फिरणं, हा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय अनुभव असे. निवृत्ती या सगळ्या उपक्रमांत आवडीने भाग घेत असे. या रम्य अनुभवांचा त्याच्या कविमनावर खोलवर प्रभाव होत होता.
कॉलेजात निवृत्तीला पहिली प्रसिद्धी मिळाली ती त्याच्या ‘काळा गुलाब’ या कवितेमुळे. ही कविता म्हणजे त्याच्या सामाजिक संवेदनशीलतेचा आणि तरल प्रतिभेचा पहिला जाहीर आविष्कार होता. या एका कवितेनं त्याला केवळ कॉलेजमध्ये ओळख मिळवून दिली नाही, तर त्याच्यातील एका मोठ्या गीतकाराची बीजं रोवली.
निवृत्तीच्या वर्गात एक हुशार पण सावळी मुलगी होती. वर्गातील काही मुलं तिच्या रंगावरून तिला चिडवत. हे पाहून निवृत्ती अस्वस्थ झाला. ‘सौंदर्य रंगात नाही, तर अंतरंगात असतं’—हा विचार त्याच्या मनात घोळत होता आणि याच विचारातून ‘काळा गुलाब’ ही सुरेख कविता जन्माला आली. ही कविता घेऊन तो आपल्या गुरूंकडे गेला. माधव जुलियन यांनी संपूर्ण कविता वाचली आणि प्रसिद्ध करण्यास अनुमोदन दिलं. ही कविता ‘राजारामियन’ मासिकात छापून आली, आणि तिने कॉलेजमध्ये धुमाकूळ घातला. विद्यार्थ्यांनी ती डोक्यावर घेतली. ज्या मुलीवर ही कविता केली होती तिनेही कवितेला निखळ दाद दिली. पुढे हीच कविता निवृत्तीने कोल्हापूरमध्ये नव्यानं सुरू झालेल्या ‘महाद्वार’ या नियतकालिकातही प्रसिद्धीस दिली. हे नियतकालिक राजाराम कॉलेजमधूनच पास झालेल्या व्यं. न. कुलकर्णी यांनी सुरू केलं होतं.
‘राजारामियन’ नियतकालिकात कविता प्रसिद्ध करताना निवृत्ती त्या ‘सावळाराम’ या नावाने प्रकाशित करू लागला. तासगावमध्ये असताना विठ्ठल पागे यांनी दिलेलं ‘सावळ्या’ हे नाव त्याला आवडलं होतंच. त्याचाच आधार घेऊन त्यानं आपल्या कविता ‘सावळाराम’ या नावाने प्रसिद्ध करण्याचा निश्चय केला. पुढे ‘सावळाराम’ला त्यानं पाटील या आपल्या आडनावाचं ‘पी’ जोडून ‘पी. सावळाराम’ असं केलं. त्या काळी व्ही. शांताराम, सी. रामचंद्र असे दिग्गज कलाकार उदयाला येत होते; त्याचाच प्रभाव म्हणून निवृत्तीने स्वतःचं नाव ‘पी. सावळाराम’ असं केलं.
राजाराम कॉलेजचा काळ निवृत्तीच्या वैचारिक आणि काव्यात्मक व्यक्तिमत्त्वाच्या घडणीत निर्णायक ठरला. कोल्हापूरच्या सांस्कृतिक वातावरणानं, प्राध्यापकांच्या मार्गदर्शनानं आणि समृद्ध विद्यार्थीजीवनानं त्याच्या विचारसंपदेचा विकास झाला. कॉलेजचं राजेशाही, कलाभिमुख वातावरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी त्याची संवेदनशीलता वाढली. साहित्यचर्चा, गप्पा, नाटकं, सहली आणि खेळ यांमुळे त्याचा आत्मविश्वास, कल्पनाशक्ती आणि सौंदर्यदृष्टी विकसित झाली. या काळात त्याच्या मनात साहित्यप्रेम, सामाजिक भान आणि सौंदर्यदृष्टीची बीजं रोवली गेली.