पाहुणा म्हणूनी आला । जरा घरात थारा दिला । दांडगाई करूनी गं बाई । चार दिवसात घरधनी झाला ।
पाहुणा म्हणूनी आला । जरा घरात थारा दिला । दांडगाई करूनी गं बाई । चार दिवसात घरधनी झाला ।
१९४८ साली बाजारात आलेल्या दोन ध्वनिमुद्रिकांनी रसिकांमध्ये सावळारामांची एक गीतकार म्हणून ओळख निर्माण केली होती. परंतु त्यांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं, ते १९४९ मध्ये रसिकांसमोर आलेल्या त्यांच्या ‘गंगा-जमुना डोळ्यांत उभ्या का?’ या अजरामर गीतानं. ज्याप्रमाणे काही माणसं नशीब घेऊन जन्माला येतात, त्याचप्रमाणे काही गाणीसुद्धा जन्मतःच रसिकांचं कौतुक घेऊन येतात. अशी गाणी केवळ काही काळापुरती गाजत नाहीत, तर लोकांच्या मनात कायमची घर करून राहतात.
‘गंगा-जमुना’ हे असंच एक ‘नशीब’ घेऊन जन्माला आलेलं गीत. या एकाच गाण्यानं गायिका लता मंगेशकर, कवी सावळाराम आणि संगीतकार वसंत प्रभू या तिघांनाही महाराष्ट्राच्या घरांघरांत पोहोचवलं आणि मराठी भावगीताच्या इतिहासात एका नव्या सुवर्णयुगाची सुरुवात झाली.
या गीताचा जन्म कोणत्याही स्टुडिओत किंवा कवीच्या खोलीत झाला नाही, तर तो झाला पुणे स्टेशनवरच्या गर्दीत. मे महिन्यातील एका दुपारची वेळ होती. सावळाराम रेल्वेच्या डब्यात बसले होते. त्याच डब्यातून एक नुकतंच लग्न झालेली मुलगी सासरी जायला निघाली होती. तिला निरोप देण्यासाठी तिची खेडूत आई आली होती. गाडीची शिट्टी वाजताच मुलीने आईला कडकडून मिठी मारली आणि ‘आई!’ म्हणत ती हमसून-हमसून रडू लागली. त्यावेळी आपल्या लेकीची समजूत काढताना ती माऊली व्याकुळ स्वरात म्हणाली,
‘बाळा, लहानपणापासून तळहातावरच्या फोडासारखं जपलं. कोंड्याचा मांडा करून तुला घास भरवला, अंगाखांद्यावर खेळवलं... आणि आता तू न्हातीधुती झाल्यावर मात्र मंगळसूत्राच्या दोऱ्यानं माझ्यापासून कायमची दुरावते आहेस! मला ‘आई’ म्हणून आता कोण हाक मारणार? तुझं गोजिरं रूपडं आता मी कुणात पाहू?’
गाडी सुरू झाली आणि प्लॅटफॉर्मवर उभी असलेली ती आई आपला हात उंचावून आपल्या लेकीला अखेरचा आशीर्वाद देत म्हणाली, ‘गंगा-जमुना डोळ्यांत उभ्या का? जा, मुली जा... दिल्या घरी तू सुखी राहा!’
आईच्या मुखातून उत्स्फूर्तपणे निघालेले हेच शब्द या अजरामर गीताची नांदी ठरली. एका सच्च्या आणि अत्यंत भावनिक क्षणातून या गीताचा मुखडा तयार झाला होता. सावळारामांनी मग तीन अंतऱ्यांत गीताची रचना केली. तिन्ही अंतऱ्यांमधील प्रत्येक शब्द इतका बोलका होता की रसिकांच्या डोळ्यांसमोर ‘पाठवणी’चा तो प्रसंग प्रत्यक्ष उभा राहतो...
गंगा-जमुना डोळ्यांत उभ्या का?। जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा… ।।
कडकडुनी तू मिठी मारता बाळे। बालपण आले, आले घुमवित घुंगुरवाळे। आठवले सारे सारे गहिवरले डोळे। कढ मायेचे तुला सांगती जा… ।।
दारात उभी राहिली खिलारी जोडी। बघ दीर धाकले बसले खोळंबुन गाडी। पूस गं डोळे या पदराने सावर ही साडी। रूपदर्पणी मला ठेवुनी जा… ।।
मोठयांची तू सून पाटलिण मानाची। हसले तुझे गं हिरवे बिलवर लगीनचुडे। बघू नकोस मागे मागे लाडके बघ पुढे। नकोस विसरू परि आईला जा… ।।
‘आठवले सारे सारे गहिवरले डोळे’ किंवा ‘पूस गं डोळे या पदराने’ यांसारख्या रचनांतून सावळारामांनी निरोप देणाऱ्या आईचं दुःखी मन सुंदर पद्धतीनं मांडलं आहे. लग्नानंतर आपली मुलगी मोठ्या घरात जावी, सुखानं नांदावी, असं प्रत्येक मुलीच्या आई-वडिलांना वाटतं. विरहाच्या दुःखापेक्षा ही भावना आई-वडिलांच्या मनात अधिक प्रबळ असते आणि हेच सावळारामांनी या गाण्यात अचूक टिपलं आहे. ‘मोठ्यांची तू सून, पाटलिण मानाची’ किंवा ‘दारात उभी राहिली खिलारी जोडी’ यातून मुलीच्या सासरची श्रीमंती सावळारामांनी व्यक्त केली आहे. कदाचित कवितेत उत्तम प्रकारे उभं केलेलं हे वैभव आणि प्रेम, घराघरांतील ‘मुलींच्या आई-वडिलांना’ भावलं असावं!
सावळाराम आणि वसंत प्रभू आपल्या मित्रांसोबत तब्बल तीन दिवस बसून या गाण्याच्या चालीसाठी खटपट करत होते. वसंत प्रभू पेटीवर वेगवेगळे सूर लावून पाहत, चाल बदलत आणि पुन्हा नवे सूर शोधत. अखेर एका क्षणी त्यांना ती अजरामर चाल गवसलीच. वसंत प्रभूंची संगीताची पारख करण्याची पद्धत अनोखी होती. त्यांनी ही चाल अंतिम करण्यापूर्वी आजूबाजूच्या काही सामान्य गृहिणींना बोलावून ऐकवली. त्या बायकांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहूनच त्यांना खात्री पटली की ही चाल थेट हृदयाला भिडणारी आहे.
गीताला न्याय द्यायला त्याच ताकदीच्या गायिकेची गरज होती. हे गीत लता मंगेशकरांनी गायला हवं, असं सावळाराम आणि प्रभू या दोघांच्या मनात आलं. लता मंगेशकर त्यावेळी जेमतेम १९ वर्षांच्या होत्या. हिंदी चित्रपटांत त्यांनी आपलं स्थान निर्माण केलं होतं, परंतु मराठीत फारशी गाणी गायली नव्हती. कामेरकरांनी लताबाईंशी सावळाराम आणि प्रभूंची ओळख करून दिली.
त्यावेळी लताबाई १९ वर्षांच्या, प्रभू २५ वर्षांचे आणि सावळाराम ३५ वर्षांचे होते. अशा प्रकारे, या तीन नवोदित कलाकारांची भेट मराठी भावगीतविश्वासाठी ऐतिहासिक ठरली.
‘गंगा-जमुना’च्या ध्वनिमुद्रिकेसाठी जोडीचे गाणे म्हणून ‘हसले गं बाई हसले’ या गीताची निवड करण्यात आली. ‘गंगा-जमुना’ ध्वनिमुद्रित होताच अवघ्या महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. या गाण्याची लोकप्रियता इतकी जबरदस्त होती की आकाशवाणीवर रसिकांच्या फर्माइशींच्या अक्षरशः राशी जमा होऊ लागल्या. प्रत्येक जण हेच गाणं पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी आतुर झाला होता. या एका गाण्याने रातोरात कवी, संगीतकार आणि गायिका या तिघांनाही लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवलं. हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की महाराष्ट्रातील प्रत्येक लग्न समारंभात, विशेषतः मुलीच्या पाठवणीच्या वेळी, ते वाजवलं जाऊ लागलं.
१९४४ ते १९४९ या कालावधीत सावळारामांनी कुर्ल्यामधील रेशन ऑफिसमध्ये नोकरी केली. ‘गंगा-जमुना’ या गीताच्या यशानंतर त्यांनी या नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्णवेळ गीतलेखनाला प्रारंभ केला.
‘गंगा-जमुना डोळ्यांत उभ्या का?’ या अजरामर भावगीताला अनेक मान्यवरांनी भरभरून दाद दिली आणि गौरवले, यातच या गीताचे मोठेपण सामावले आहे. आचार्य अत्रे यांनी या गीताचे केलेले कौतुक विशेष उल्लेखनीय आहे. त्यांनी म्हटलं होतं की, ‘गंगा-जमुना हे गाणे एका पारड्यात व दुसऱ्या पारड्यात सावळारामांची इतर सगळी गाणी घातली तरी गंगा-जमुना’चे पारडे जड होईल!’
कथाकार, पटकथा-संवादलेखक आणि दिग्दर्शक दिनकर पाटील यांनी ‘गंगा-जमुना’ विषयी म्हणतात, ‘जोपर्यंत आपली लग्नसंस्था अस्तित्वात आहे, तोपर्यंत त्या गाण्याची गोडी अवीट राहील.’
ग. दि. माडगूळकर यांना हे गाणं फारच आवडलं होतं. रेकॉर्ड बाजारात आल्यानंतर सावळाराम त्यांना भेटले तेव्हा गदिमांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी ‘गंगा-जमुना’च्या भावनोत्कटतेबद्दल गौरव करताना म्हटलं, ‘हे गीत ऐकताना ज्याचे अंतःकरण भरून आले नाही आणि पापण्या ओलावल्या नाहीत, असा श्रोता शोधून सापडणार नाही.’
या एकाच गीताने पी. सावळाराम, वसंत प्रभू आणि लता मंगेशकर या तिघांनीही मराठी रसिकांच्या मनात कायमचं घर केलं. लताबाईंचा सुमधुर आवाज आणि वसंत प्रभूचं सुरेल संगीत वादातीत होतं. परंतु सावळारामांनी गीतामध्ये वेचून गुंफलेले शब्द या गीताला कालातीत करून गेले!