भावाविण हा दिन सोन्याचा । आज उदासीन या बहिणीचा । होऊन बंधू ये रे चंद्रा । दीपांच्या राउळी ।।
भावाविण हा दिन सोन्याचा । आज उदासीन या बहिणीचा । होऊन बंधू ये रे चंद्रा । दीपांच्या राउळी ।।
‘गंगा-जमुना डोळ्यांत उभ्या का?’ या गीताच्या यशानंतर सावळारामांना चित्रपट संगीतात मानाचं स्थान तर मिळालंच, परंतु गैर-चित्रपट सुगम संगीतातली त्यांची कारकिर्द त्याहूनही अधिक यशस्वी ठरली. १९५० ते १९८० या त्यांच्या ३० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांची १२५ हून अधिक गैर-चित्रपट गीतं प्रकाशित झाली. त्यात ७४ भावगीतं, १७ भक्तिगीतं, १२ गवळणी आणि १८ नाट्यसंगीत रचना अशा विविध गीतप्रकारांत त्यांनी योगदान दिलं.
चित्रपटगीतं लिहिताना कथा, प्रसंग, कलाकार या सर्वांचा विचार करून गाणी लिहावी लागतात, त्यामुळे कवीच्या कल्पनाविस्तारावर मर्यादा येतात. परंतु सुगम संगीतात अशा मर्यादा नसतात. कवी आपली प्रतिभाशक्ती अमर्याद व्यक्त करू शकतो. कदाचित याच कारणानं सावळारामांचं काव्य सुगम संगीतात फुलून आलं. या क्षेत्रात त्यांनी लिहिलेली अनेक गीतं अजरामर झाली.
सावळारामांनी आपल्या कारकिर्दीत गैर-चित्रपट संगीत क्षेत्रात १७ हून अधिक भक्तिगीतं लिहिली. त्यांची भक्तिगीतं मुख्यत्वे पांडुरंग, पंढरपूर, चंद्रभागा आणि वारकरी यांच्या भोवती फिरतात. सावळारामांच्या रोमारोमांत रुजलेली विठ्ठलभक्ती त्यांच्या प्रत्येक ओव्या-अभंगातून जिवंत होताना दिसते. त्यांच्या भक्तिगीतांत भेटणारा भोळा वारकरी विठ्ठलभक्तीत मग्न होतो आणि चंद्रभागेच्या वाळवंटात ज्ञानोबा-तुकाराम यांच्या गजरात तल्लीन नाचताना डोळ्यांसमोर उभा राहतो. सावळारामांनी अनेक चित्रपटांसाठीही अप्रतिम भक्तिगीतं लिहिली आहेत.
सावळारामांनी लिहिलेल्या भक्तिगीतांमधल्या शब्दांचा मागोवा घेणं कदाचित शक्य आहे, परंतु त्यांची विठ्ठलाप्रती दडलेली श्रद्धा ज्यानं त्यानं त्यांच्या काव्यातून अनुभवायला हवी.
सावळारामांनी रचलेल्या बहुतांश भक्तिगीतांना वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलं आहे, तर ती गायली आहेत लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी. त्यांच्या भक्तिगीतांत काही पारंपरिक भक्तिगीतं आहेत, तर बर्याच गीतांमध्ये भक्तीपर लेखन असलं तरी सामाजिक बांधिलकीवर प्रकाश टाकणारे आशय आहेत. पारंपरिक भक्तिगीतांत सावळारामांनी पांडुरंगावरची उत्कट भक्ती, त्याच्या रूपाचे आणि गुणांचे वर्णन, तसंच भक्तांची अढळ श्रद्धा यांवर गीतरचना केली आहे. परंतु अनेक भक्तिगीतांत समाजात असलेली विषमता आणि भेदाभेद, तसंच गैर चालीरीतींवर प्रकाश टाकला आहे. त्यांच्या मनातली समाजातील विषमतेविषयी असणारी खंत या काव्यांतून स्पष्ट दिसते.
पारंपरिक भक्तिगीतं
पारंपरिक भक्तिगीतांत, ‘विठ्ठला, समचरण तुझे धरिते । रूप सावळे दिव्य आगळे अंतर्यामी भरते’ हे सावळारामांनी लिहिलेलं आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं भक्तीगीत अतिशय गाजलं. मराठी जनमानसांत या भक्तिगीतानं कायमचं घर केलं आहे. या काव्यात स्त्रीहृदयाचं विठ्ठलाप्रती असलेलं समर्पण व्यक्त करताना सावळारामांच्या प्रतिभेची कमाल दिसते. अंतऱ्यात सावळाराम म्हणतात:
नेत्रकमल तव नित फुललेले । प्रेममरंदे किती भरलेले । तव गुण-गुंजी घालीत रुंजी । मानस-भ्रमरी फिरते ।।
अरुण-चंद्र हे जिथे उगवती । प्रसन्न तव त्या अधरावरती । होऊन राधा माझी प्रीती । अमृतमंथन करिते ।।
जनी लाडकी नामयाची । गुंफून माला प्राणफुलांची । अर्पून कंठी मुक्तीसाठी । अविरत दासी झुरते ।।
अर्थात, “विठ्ठला, तुझे नेत्रकमल प्रेमाच्या मधुररसाने भरले आहेत आणि माझे मन त्याभोवती भ्रमराप्रमाणे भिरभिरते आहे. चंद्र-सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेल्या तुझ्या ओठांवर मी राधा होऊन अमृतमंथन करत आहे. जनाबाईप्रमाणे प्राणफुलांची माळ गुंफून तुझ्या कंठी अर्पण करते आहे; आणि मुक्तीसाठी मीही तशीच झुरते आहे.”
मूर्त रूप जेथे:
त्यानंतर आशा भोसले यांनी गायलेलं ‘मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपतीचे, पंढरीला लाभे भाग्य वैकुंठीचे’ या भावगीतात सावळारामांनी भक्त पुंडलिकावरलं विठ्ठलाचं निस्सीम प्रेम, पंढरपुरी असलेली चंद्रभागा आणि दर आषाढीला तिथं होणारी वैष्णवांची गर्दी हे पंढरपूरचं वर्णन अतिशय सोप्या शब्दांत, परंतु प्रभावीपणे केलं आहे.
धुंडीत शोधित सख्या पांडुरंगा । भक्ती होऊनिया आली चंद्रभागा । तीर्थ रोज घेता देवचरणांचे । उजळे पावित्र्य जिच्या जीवनाचे ।।
मायपित्याच्या प्रेमाचा पाईक । पंढरीला येता पुत्र पुंडलिक । वेड लागोनि त्या भक्तदर्शनाचे । विटेवरी उभे द्वैत विठ्ठलाचे ।।
आषाढीला होता वैष्णवांची दाटी । नाम प्रलयात बुडे सर्व सृष्टी । युगे अठ्ठावीस बाळ देवकीचे । जोजवीत जेथे पान पिंपळाचे ।।
रघुपति राघव गजरी गजरी:
असंच एक अतिशय सोप्या शब्दात मांडलेलं आणि अतिशय गाजलेलं सावळारामांचं भक्तीगीत म्हणजे, ‘रघुपति राघव गजरी गजरी तोडित बोरे शबरी’. हे गीत आशा भोसले यांनी गायलं आहे. हे गीत शबरीच्या अखंड आणि निष्काम भक्तीचं चित्र अत्यंत भावपूर्ण रीतीनं उभं करतं. तिच्या ध्यासात फक्त रामच आहे. रामनाम तिच्यासाठी मधुर अमृत आहे. वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेतही तिची श्रद्धा तसूभरही ढळली नाही. राम येईल या विश्वासाने ती प्रसन्न आणि भक्तीमय जीवन जगते. राम येईल तेव्हा तिची भक्ती आणि प्रेम पूर्णत्वास जाईल.
तूच कर्ता आणि करविता:
सावळारामांचं गाजलेलं आणखी एक भक्तीगीत म्हणजे, ‘तूच कर्ता आणि करविता शरण तुला भगवंता’ हे लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत भक्ताच्या संपूर्ण समर्पणाची भावना व्यक्त करतं. देवच सृष्टीचा कर्ता-करविता आहे; निसर्गातली प्रत्येक कृती त्याच्या शक्तीनेच घडते. सुख-दुःख, जन्म-मरण त्याच्याच कृपेने मिळते. देव सर्वत्र आहे — देऊळ, मूर्ती, पूजा, भक्ती सर्व तोच. त्यामुळे त्याच्याकडे शरण जाण्यातच खरी पूर्ती आहे.
सामाजिक जाणीव
समाज प्रबोधन करणाऱ्या भक्तीगीतांच्या शृंखलेत आशा भोसले यांनी गायलेलं “पंढरीनाथा झडकरी आता” हे सावळारामांचं काव्य अग्रणी आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेशबंदी होती त्या काळाला संबोधून हे काव्य आहे. यातला अन्याय, भेदभाव आणि देवाच्या नावाने पसरलेले पाखंड यावर सावळारामांनी कडक प्रहार केला आहे.
पंढरीनाथा झडकरी आता:
“पंढरीनाथा झडकरी आता, पंढरी सोडून चला विनविते रखुमाई विठ्ठला”
असं म्हणत सावळारामांनी उद्विग्न रखुमाईच्या तोंडी हे काव्य मांडलं आहे.
“ज्ञानदेवे रचिला पाया, कळस झळकेवरी तुकयाचा…” असा सुवर्णकाळ पंढरपूरनं पहिला. पण जसजसा काळ गेला, तसतसं मंदिरात पाखंड, जातीभेद आणि देवपणाचा ‘व्यवसाय’ पसरला—
“धरणे धरुनी भेटीसाठी, पायरीला हरिजन मेळा । भाविक भोंदू पूजक म्हणती, केवळ अमुचा देव उरला ।।”
हे चित्र रखुमाईला बघवत नाही. पांडुरंगाला पंढरपूर सोडून जाण्याचा आग्रह ती धरते आणि निर्वाणीचा इशारा देते—“यायचे तर लवकर बोला, ना तर द्या हो निरोप मजला.”
हे भक्तीगीत प्रचंड गाजलं. सावळारामांच्या भावनिक हाकेला रसिकांनी भरभरून दाद दिली.
धागा धागा अखंड विणूया:
आशा भोसले यांनी गायलेलं “धागा धागा अखंड विणूया विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया” या भक्तिगीतात सावळारामांनी विश्वबंधुत्वाचं सार मांडलंय. अंतऱ्यात ते म्हणतात,
अक्षांशाचे रेखांशाचे । उभे आडवे गुंफून धागे । विविध रंगी वसुंधरेचे । वस्त्र विणिले पांडुरंगे । विश्वंभर तो विणकर पहिला । कार्यारंभी नित्य स्मरुया ।।
करचरणांच्या मागावरती । मनामनांचे तंतू टाका । फेकुन शेला अंगावरती । अर्धीउघडी लाज राखा । बंधुत्वाचा फिरवित चरखा । एकत्वाचे सूत्र धरूया ।।
आपण सर्वांनी प्रेम, एकता आणि बंधुत्वाचे धागे एकमेकांत गुंफत राहावे. या जगातील विविध माणसे, भाषा आणि रंग हे सर्व विठ्ठलानेच विणलेल्या मोठ्या वस्त्राचे भाग आहेत. विठ्ठल हा जगाचा पहिला विणकर आहे—त्याचे स्मरण करून आपणही मन, कृती आणि विचारांनी एकत्वाचा धागा धरावा. समाजातल्या दुःखी, गरिबांना आधार द्यावा. बंधुत्वाच्या चरख्यावर प्रेमाचे सूत तयार करून समाजात एकता आणि मानवतेची वीण गुंफावी —हीच खरी विठ्ठलभक्ती.
जो आवडतो सर्वांला:
आशा भोसले यांनी गायलेलं ‘जो आवडतो सर्वांला’ या भक्तिगीतातून सावळारामांनी खरं देवपूजन म्हणजे मानवतेची सेवा, कारण माणसांवरील प्रेम, करुणा आणि मदत करणारा मनुष्यच देवाला खरोखर प्रिय असतो असा विचार मांडला आहे. ते लिहितात,
जो आवडतो सर्वांला, तोचि आवडे देवाला ।।
दीन भुकेला दिसता कोणी घास मुखीचा मुखी घालुनी, दुःख नेत्रीचे घेता पिउनी फोडि पाझर पाषाणाला ।।
घेऊनि पंगु आपल्या पाठी आंधळ्याची होतो काठी, पायाखाली त्याच्यासाठी देव अंथरी निज हृदयाला ।।
जनसेवेचे बांधुन कंकण त्रिभुवन सारे घेई जिंकुन, अर्जुन आपुले हृदसिंहासन नित भजती मानवतेला ।।
देव मनुष्याच्या मंदिरात नसून माणसाच्या माणुसकीत आहे. जो लोकांना प्रेमाने वागवतो, भुकेल्याला अन्न देतो, अपंगांचा आधार बनतो आणि जनसेवेचा मार्ग स्वीकारतो, तोच देवाला प्रिय ठरतो. खरी भक्ती म्हणजे पूजा नाही; तर मानवतेची सेवा, करुणा आणि बंधुत्व होय. जो सर्वांच्या हृदयात स्थान मिळवतो, तोच देवाच्या हृदयातही स्थान प्राप्त करतो.
सखू आली पंढरपुरा:
‘सखू आली पंढरपुरा’ हे आशा भोसले यांनी गायलेलं भक्तीगीत देखील श्रवणीय आहे. हे गीत संत सखूच्या निष्कलंक प्रेमाची, संकटांतील धडपडीची आणि देवापुढील संपूर्ण समर्पणाची हृदयस्पर्शी कहाणी आहे. सखूचं विठ्ठलाविषयीचं प्रेम हे तिच्या जगण्यापेक्षा मोठं झालं आहे.
सावळारामांची भक्तिगीतं फक्त भक्ती व्यक्त करणारी नाहीत, तर भक्तीच्या माध्यमातून समाज, मनुष्यत्व आणि ममत्व जागवणारी आहेत. त्यांच्या भक्तिगीतांत लोकसंस्कृती, वारकरी परंपरा, सामाजिक जाणीव आणि मानवतेचा दिव्य प्रकाश एकरूप होतो. ही गीतं केवळ श्रवणीय नसून मनाला घडवणारी, समाजाला उन्नत करणारी आहेत.