आई कुणा म्हणू मी, तुजवीण सांग आई? । इतुकेच सांगण्याला येशील का गं आई? ।।
आई कुणा म्हणू मी, तुजवीण सांग आई? । इतुकेच सांगण्याला येशील का गं आई? ।।
१९४९ साली आलेल्या गंगा-जमुना’ या गीतामुळे सावळाराम भावगीतांच्या विश्वातल्या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. पुढल्याच वर्षी, १९५० मध्ये, त्यांना ‘रामराम पाहुणं’ या चित्रपटासाठी चित्रगीत लिहिण्याची संधी मिळाली. हा चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरला आणि सावळारामांना चित्रपटात गीतकार म्हणून प्रचंड मागणी वाढू लागली. १९५० ते १९८० या त्यांच्या तीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ५२ चित्रपटांसाठी गीतरचना केल्या. या चित्रपटांतून जवळजवळ २०० चित्रगीतांची निर्मिती झाली. त्यांच्या तीस वर्षांच्या कारकिर्दीत १९५० ते १९६० हे दशक त्यांच्यासाठी सुवर्णकाळ ठरलं. त्यांची अर्ध्याहून अधिक चित्रगीते या दशकातच रसिकांसमोर आली.
गीतकार सावळाराम – संगीतकार वसंत प्रभू या जोडीनं एकत्र येऊन केलेली निर्मिती यशाची गुरुकिल्ली बनली. त्याकाळी ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांचं मोठं नाव होतं. त्यांना प्रभावी पर्याय म्हणून सावळाराम–वसंत प्रभू यांच्याकडे पाहिले जाऊ लागलं. माडगूळकरांची गाणी ‘चित्रदर्शी’ असत, तर सावळारामांची गाणी अतिशय भावनात्मक असत. सावळारामांनी ग. दि. माडगूळकरांसारख्या प्रस्थापित गीतकाराच्या लोकप्रियतेच्या काळातही चित्रगीतांवर आपला स्वतंत्र ठसा उमटवला.
सावळारामांना चित्रपटात प्रवेश देणारे आणि सातत्याने त्यांच्याबरोबर काम करणारे चित्रपट दिग्दर्शक म्हणजे, कोल्हापूरचे त्यांचे कॉलेज मित्र, दिनकर पाटील. त्यांच्या व्यतिरिक्त कोल्हापूरचेच माधव शिंदे या दिग्दर्शकाबरोबर देखील सावळारामांनी अनेक चित्रपट केले. विशेष म्हणजे माधव शिंदे यांच्या बर्याच चित्रपटांत कथालेखनाचं काम दिनकर पाटील यांनीच केलं.
अर्थात, दिनकर पाटील आणि माधव शिंदे यांच्याव्यतिरिक्त अनेक दिग्दर्शकांबरोबर सावळारामांनी काम केलं. त्यात प्रामुख्यानं पुढील नावं घेता येतील: भालजी पेंढारकर, यशवंत पेठकर, दत्ता माने, माधव भोईटे, राम कदम, कृष्णा पाटील, केशव तळपदे, माधव कांबळे, दादा (केशव) परांजपे, मनोहर रेळे, व्ही. अवधूत, विश्वनाथ कामत, प्रभाकर पेंढारकर, राजा ठाकूर, नंदू खोटे, शुभा खोटे, श्रीकांत सुतार, दत्ता चव्हाण.
दिनकर पाटील
सावळारामांचे कोल्हापुरातील राजाराम कॉलेजपासूनचे स्नेही दिनकर द. पाटील आता चित्रपट निर्माते-दिग्दर्शक झाले होते. ‘रामराम पाहुणं’ या चित्रपटाची ते निर्मिती करत होते. या चित्रपटासाठी त्यांनी शांता शेळके यांना गीतकार म्हणून घेतलं होतं. मात्र, लावणी लिहिताना शांता शेळके थबकल्या आणि त्यांनी लावणीचा ठसका आपल्या लेखणीत नसल्याचे सांगितलं. लावणीसाठी कुणाकडे जावे असा प्रश्न आता पाटलांना पडला. सावळाराम हे पाटलांचे राजाराम कॉलेजमधील जुने मित्र, परंतु त्यांचा संपर्क तुटला होता. योगायोगाने पाटील आणि सावळाराम तसेच वसंत प्रभू यांची एका मैफिलीत भेट झाली. या भेटीनंतर पाटलांनी सावळारामांना ‘रामराम पाहुणं’साठी लावण्या आणि काही गीतं लिहायला सांगितली आणि सावळारामांनी आनंदानं ती लिहून दिली. लावण्यांचं संगीत वसंत प्रभूंकडे सोपवावं असा आग्रह सावळारामांनी धरला. पाटलांना वसंत प्रभूंच्या संगीताची गोडी माहीत होती. त्यांनी सावळारामांची विनंती मान्य केली. ‘रामराम पाहुणं’ प्रदर्शित झाला आणि चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरला.
‘रामराम पाहुणं’मधली ‘माझ्या शेतात सोनंच पिकतंय’, ‘पाहुणा म्हणुनी आला’ आणि ‘शपथ दुधाची,’ ही गाणी विशेष गाजली. ‘माझ्या शेतात सोनंच पिकतंय,’ या गीतात सावळारामांनी आपल्या कल्पनावैभवाची प्रचिती दिली आहे:
“साता समिंदराचं माणिक मोती । देवाच्या हातानं आलं रे खालती । झेललं रे झेललं वरच्या वरती । पिकाच्या डोईवर कणसात भरतंय ।”
सावळारामांच्या काव्यरचना सर्वसाधारणपणे भावनाप्रधान आणि कुटुंबवत्सल होत्या. परंतु प्रसंगानुरूप सावळारामांनी त्याच चित्रपटात वरकरणी भोळी परंतु खट्याळ स्त्री अतिशय खुबीने मांडली:
“पाहुणा म्हणूनी आला । जरा घरात थारा दिला । दांडगाई करूनी गं बाई । चार दिवसात घरधनी झाला ।”
चित्रपटाच्या यशामुळं दिनकर पाटलांनी त्यांच्या पुढील ‘पाटलाचा पोर’ या दुसऱ्या चित्रपटासाठी सावळारामांचीच गीतकार म्हणून निवड केली. एकट्याने सारी गीते लिहिलेला ‘पाटलाचा पोर’ हा सावळारामांचा पहिलाच चित्रपट ठरला. या चित्रपटातली ‘प्रीत जिंकुनि अजिंक्य झाले’, ‘नशीब शिकंदर माझे’, ‘जीव जडला ज्याच्यावरती’ ही गाणी खूप प्रसिद्ध झाली.
शारदा (१९५१), माय बहिणी (१९५२), तारका (१९५४), कुलदैवत (१९५५), मूठभर चणे (१९५५), देव जागा आहे (१९५७), नवरा म्हणू नये आपला (१९५७) अशा एकूण नऊ चित्रपटांसाठी दिनकर पाटलांनी सावळारामांना गीतकार म्हणून निवडलं. या नऊ चित्रपटांपैकी सात चित्रपटांचं संगीत वसंत प्रभू यांचच होतं. दिनकर पाटील, सावळाराम, वसंत प्रभू ही त्रयी आणि त्यांच्या साथीला लता-आशा यांचा आवाज यांनी एकामागून एक दर्जेदार चित्रपट संगीत मराठी रसिकांना दिलं. दिनकर पाटील आपल्या चित्रपटांच्या यशात पन्नास टक्के वाटा सावळारामांच्या गीतलेखनाला देत.
माधव शिंदे
माधव रावजी शिंदे यांच्याबरोबर देखील सावळारामांनी दहा चित्रपटांसाठी गीतं लिहिली. माधव शिंदे हे देखील मूळचे कोल्हापूरचे. त्यांनी ‘हंस पिक्चर्स’मध्ये मास्टर विनायक यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र दिग्दर्शनाला प्रारंभ केला. तमाशाप्रधान चित्रपटांऐवजी कौटुंबिक भावनांवर आधारित चित्रपटांना त्यांनी प्राधान्य दिलं.
माधव शिंदेंच्या चित्रपटांपैकी सुरुवातीच्या काळात आलेला आणि गाजलेला चित्रपट म्हणजे ‘वादळ’ (१९५३). विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती लता मंगेशकर यांनी केली होती. या चित्रपटातील सावळारामांनी लिहिलेली आणि वसंत प्रभूंनी स्वरबद्ध केलेली गाणी देखील अतिशय गाजली. ‘जीवित माझे तुला’ या गाण्यात सावळारामांनी एका पतिव्रतेचं चित्र हुबेहूब उभं केलं आहे. पतीच्या जीविताची सलामी मागणारी ही स्त्री म्हणते—
‘जीवित माझे हवे तुला, घेऊन जा तू आता । सुवासिनीचे कुंकू हिरावून नकोस नेऊ नाथा ।।’
‘अश्रुफुलांचा अभिषेक करिते विरहिणीची प्रीती । ढळेल शांती पुजारिणीची कळस गोपुरी नसता ।।’
माधव शिंदे यांच्या दहा चित्रपटांना सावळारामांनी गीतं लिहिली. त्यापैकी वादळ हा चित्रपट धरून सहा चित्रपटांना वसंत प्रभूंनी संगीत दिलं. हे चित्रपट म्हणजे, मायेचा पाझर (१९५२), वादळ (१९५३), बाळ माझं नवसाचं (१९५५), गृहदेवता (१९५७), शिकलेली बायको (१९५९) आणि कन्यादान (१९६०). यातील बहुतांश चित्रपटातली गाणी गाजली.
‘बाळ माझं नवसाचं’ या चित्रपटातील “बाळ माझं नवसाचं, स्त्रीजन्माच्या सार्थकतेला फूल आलं हर्षाचं”, “माय पिता तो खरा दयाळू, देव कुणाचा नाही वैरी; माणसाचा माणूस वैरी, सुख नांदेल कसं घरी?” आणि “बाळ कुशीला देण्यासाठी, चिमणे चुंबन घेण्यासाठी; जितुके जीवन असेल गाठी, देईन तुजला दयाघना” या सावळारामांच्या सुरेख काव्यरचनांतून ही गाणी रसिकांच्या मनात घर करून गेली.
‘शिकलेली बायको’ हा माधव शिंदे दिग्दर्शित चित्रपट एका सुशिक्षित तरुणीची कथा आहे. कॉलेजमध्ये शिकलेल्या या तरुणीचं लग्न ग्रामीण पार्श्वभूमीच्या नायकाशी होतं. शिक्षण, स्वभाव आणि जीवनदृष्टी यांमधून निर्माण होणारे संघर्ष, गाव-शहरातील संस्कारभेद आणि त्या प्रवासातील तिच्या भावनिक चढ-उतारांवर चित्रपट आधारलेला आहे. सावळाराम-वसंत प्रभू या जोडीने चित्रपटासाठी तयार केलेल्या गाण्यांना लता, उषा आणि हृदयनाथ या मंगेशकर कुटुंबानं गायली आहेत. चित्रपटातील ‘आली हासत पहिली रात, उजळत प्राणांची फुलवात’, ‘प्रेमा, काय देऊ तुला?, भाग्य दिलेस तू मला’ यांसारखी गाणी खूप गाजली. त्यानंतर माधव शिंदे यांचा ‘गृहदेवता’ हा चित्रपट ताश्कंद महोत्सवात दाखवला गेला.
१९६० मध्ये आलेल्या ‘कन्यादान’ या चित्रपटातून माधव शिंदे–सावळाराम–वसंत प्रभू या त्रयीने त्यांच्या चित्रगीतांचा जणू कळस गाठला.
‘माझिया नयनांच्या कोंदणी’ हे सावळाराम–वसंत प्रभू–लता मंगेशकर यांचं गाणं अनेक वेळा ऐकलं जातं. ते चिरकाल स्मरणात राहिलं, याचं कारण सावळारामांच्या कविकल्पनेतली प्रतिभा. पहाटेचं त्यांनी केलेलं वर्णन अतुलनीय आहे.
नायिकेच्या नयनांच्या “कोंदणामध्ये”, म्हणजे मनात जपलेल्या, जिव्हाळ्याच्या ठिकाणी, प्रसन्नतेचं प्रतीक असलेला शुक्रतारा उमलला आहे. अंधार मागे सरत आहे. रात्र संपत चालली आहे. पहाटेचा थंड, स्पर्शून जाणारा वारा वाहू लागला आहे. प्राजक्ताचं झाड फुलांनी बहरलं आहे. प्राजक्ताचा सुगंध मनाला ताजातवाना करतो आहे. रात्रीनंतर नेहमीप्रमाणे पहाटेचा प्रहर येतो. पहाट जणू भूपाळी गुणगुणत उगवते आहे.
मनाचा आनंद ‘पूर्व दिशेच्या नयनात’, म्हणजे सूर्योदयाच्या प्रकाशात रंगून जातो. पानांवरच्या दवबिंदूंवर सूर्यकिरण पडतात आणि क्षणभर ते सोन्यासारखे उजळतात. तो सुवर्णक्षण मनालाही प्रकाशमान करून जातो. प्रत्येक सूर्यकिरणातून पृथ्वीचं स्वर्गीय सौंदर्य उमलतं.
कन्यादान चित्रपटातील ‘लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची’, ‘कोकिळ कुहुकुहू बोले’, तू माझा — तुझी मी झाले’, ‘मानसीचा चित्रकार, तो तुझे निरंतर चित्र काढतो’ ही गाणी देखील मराठी चित्रपटसंगीतातील अजरामर ठेवा होऊन गेली आहेत.
‘कांचनगंगा’ (१९५४) हा चित्रपट वगळता माधव शिंदे यांच्या सर्व चित्रपटांत सावळारामांच्या गाण्यांना वसंत प्रभूंनी स्वरबद्ध केलं. १९६० नंतर वसंत प्रभूंनी मोजक्याच चित्रपटांना संगीत दिलं. या काळात माधव शिंदे यांच्या चित्रपटांत सावळारामांच्या गीतांना इतर अनेक मान्यवरांनी संगीत दिलं: ‘माणसाला पंख असतात’ (१९६१) — जितेंद्र अभिषेकी; ‘लक्ष्मी आली घरा’ (१९६५) — दत्ता डावजेकर; ‘धर्मकन्या’ (१९६८) — हृदयनाथ मंगेशकर.
‘माणसाला पंख असतात’ या चित्रपटातले ‘पंख हवे मज पोलादाचे, शूर लढाऊ जटायुचे’ हे सावळारामांचं गीत लक्षणीय आहे. स्त्री-सन्मान आणि दुर्बलांचं संरक्षण ही पवित्र जबाबदारी आहे. शक्ती मोठी असो वा लहान, जेव्हा अन्याय दिसतो, तेव्हा जटायु, गरुड किंवा टिटवीसारखं धैर्य दाखवलं पाहिजे, असं वर्णन करणाऱ्या या गीतात सावळारामांनी वीररस समरसून ओतला आहे.
‘लक्ष्मी आली घरा’ या चित्रपटातली हृदयनाथ मंगेशकरांनी गायलेली भूपाळी सावळारामांनी अतिशय सुरेख लिहिली आहे. ‘धर्मकन्या’ या हृदयनाथांनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटातली ‘चोच जयाने दिधली बाळा’, ‘गोड गोजिरी लाजलाजरी’, ‘सखी गं मुरली मोहन’ या गाण्यांनी तर रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकलं.