तोडीत ना फुलाला वेलीस्वये कधीही । सोडून तू मुलाला गेलीस का गं आई? ।। चुकतो असेन मी मग, म्हणतो तुला मी आई । चुकली गं तू परी का, होऊन माझी आई?।।
तोडीत ना फुलाला वेलीस्वये कधीही । सोडून तू मुलाला गेलीस का गं आई? ।। चुकतो असेन मी मग, म्हणतो तुला मी आई । चुकली गं तू परी का, होऊन माझी आई?।।
दिनकर पाटील आणि माधव शिंदे यांच्यासोबतच्या सहकार्याची चर्चा आपण केली. परंतु सावळारामांनी इतर अनेक दिग्दर्शकांबरोबर काम केलं. त्या सहकार्यातूनही असंख्य लक्षवेधी आणि कालातीत गीतं जन्माला आली. त्यांच्या संपूर्ण गीतनिर्मितीचा वेध एका प्रकरणात घेणं शक्य नाही. तरीही या विश्लेषणात काही निवडक गीतांचा उल्लेख केला आहे. ही निवड त्यांच्या प्रतिभेची केवळ एक झलक आहे. कारण तीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत सावळारामांनी प्रचंड ताकदीची अनेक गाणी मराठी रसिकांना दिली आहेत.
पुत्र व्हावा ऐसा
१९६२ मध्ये निर्माते दिनकर जोशी यांनी ‘पुत्र व्हावा ऐसा’ या चित्रपटाची निर्मिती केली. चित्रपटाचे दिग्दर्शक होते राजा ठाकूर. या चित्रपटाची मूळ कथा सावळाराम यांनीच लिहिली होती. त्यांनी दिनकर जोशींना कथा ऐकवली. जोशींना कथा आवडली आणि त्यावर चित्रपट निर्माण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कथा आणि गाणी सावळारामांची होती; परंतु, पटकथा मधुसूदन कालेलकर यांनी लिहिली. संगीत वसंत प्रभूंनी दिलं.
‘पुत्र व्हावा ऐसा’ चित्रपटातली सावळारामांनी लिहिलेली गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं ‘जिथे सागरा धरणी मिळते’ या गाण्याने तर लोकप्रियतेचा इतिहास रचला. याशिवाय आशा भोसले यांचं ‘आई कुणा म्हणू मी’ आणि तलत मेहमूद यांचं ‘यश हे अमृत झाले’ ही गाणी देखील अतिशय गाजली.
राजा ठाकूर यांना चित्रपटात एक गाण्याचा प्रसंग चित्रित करायचा होता. महाडच्या जवळ एका खडकाळ समुद्रकिनारी या प्रसंगाचं चित्रण करण्याचं त्यांच्या मनात होतं. समुद्रकिनाऱ्यावरील एका खडकावर बसून नायिका गाणं गाते, असं दृश्य होतं. राजा ठाकूर यांनी सावळारामांना प्रसंग सांगितला आणि त्यावर गाणं लिहायला सांगितलं. गाणं उठावदार व्हावं यासाठी सावळारामांनी त्या जागेला प्रत्यक्ष भेट देऊन मगच शब्दांकन करण्याचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे ते त्या जागी गेले. तेथे समुद्र, समुद्राच्या लाटांचं खडकांवर येऊन आपटणं, बाजूला असलेला वाळूचा किनारा हे सारं पाहून सावळारामांना गीताचा मुखडा सुचला — ‘जिथे सागरा धरणी मिळते, तिथे तुझी मी वाट पाहते’. सावळाराम परत आले. त्यानंतर बरेच दिवस ते योग्य शब्द जुळवत होते. त्यातून पुढची कडवी तयार झाली आणि गाण्यानं इतिहास घडवला. ते दृश्य आणि नायिकेच्या भावना कशा समरस झाल्या आहेत, याचं अत्यंत सुरेख वर्णन गाण्याच्या बोलांमध्ये आहे:
जिथे सागरा धरणी मिळते । तिथे तुझी मी वाट पाहते ।।
डोंगरदरीचे सोडून घर ते । पल्लव पाचूचे तोडून नाते । हर्षाचा जल्लोष करुनी जेथे । प्रीत नदी एकरूपते ।।
वेचित वाळूत शंख शिंपले । रम्य बाल्य ते जिथे खेळले । खेळाचा उल्हास रंगात येउनी । धुंदीत यौवन जिथे डोलते ।।
बघुनी नभीची चंद्रकोर ती । सागरहृदयी उर्मी उठती । सुखदुःखाची जेथे सारखी । प्रीत जीवना ओढ लागते ।।
‘पुत्र व्हावा ऐसा’ चित्रपटातलं दुसरं प्रभावी गाणं म्हणजे, ‘आई कुणा म्हणू मी?’. मातृवियोगाचं हृदयस्पर्शी वर्णन सावळारामांनी या काव्यात केलं आहे:
आई कुणा म्हणू मी, तुजवीण सांग आई? । इतुकेच सांगण्याला येशील का ग आई? ।।
तोडीत ना फुलाला वेलीस्वये कधीही । सोडून तू मुलाला गेलीस का गं आई? ।।
रागावण्या तुलाही मजवीण बाळ नाही । बाळाविना तुलाही कोणी म्हणेल आई? ।।
चुकतो असेन मी मग, म्हणतो तुला मी आई । चुकली गं तू परी का, होऊन माझी आई?।।
बायकोचा भाऊ
१९६२ साली माधव भोईटे दिग्दर्शित ‘बायकोचा भाऊ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला वसंत प्रभूंनी संगीत दिलं होतं, तर गीतरचना सावळारामांची होती. या चित्रपटातली ‘आली दिवाळी’, ‘कोकिळा गा गा रे’ आणि अन्य गाणी खूप गाजली. ‘कोकिळा गा गा रे’ हे वसंत प्रभूंनी स्वरबद्ध केलेलं आणि आशा भोसले यांनी गायलेलं गाणं रसिकांसाठी अतिशय आल्हादकारक अनुभव ठरलं. या गाण्यातील सावळारामांचे भाव आणि शब्दरचना अतुलनीय आहेत.
सावळारामांचं हे काव्य कोकिळेला उद्देशून आहे. त्यांनी कोकिळेला ‘भूलोकीचा गंधर्व’ अशी उपमा देऊन हे काव्य रचलं. ते म्हणतात, ‘तुझ्या सप्तसुरांनी तू पृथ्वीवर स्वर्ग उभारतेस. तुझ्या सुरांनी सर्व सजीवांना नवं जीवन मिळतं. तुझ्या गीतांमुळे पृथ्वी नंदनवनासारखी फुलून येते. पानांत, फुलांत तूच गात असतेस. तुझ्या मधुर स्वरांनी संपूर्ण पृथ्वी मोहित होते. ही कोमल निसर्गमाता आनंदाने नाचू लागते. प्रेमाचं इंद्रधनुष्य उमलतं. तुझा पंचम सूर जणू प्रेमाचा अग्नी पेटवतो. प्रेम आणि अनुराग यांच्या मीलनाला तू सुरांनी सुशोभित करतेस.’
याच चित्रपटातल्या ‘आली दिवाळी’ या गीतात नायिका आपल्या भावाच्या अनुपस्थितीत चंद्राला ओवाळते याचं वर्णन देखील सावळारामांनी अतिशय भावुक शब्दात केलं आहे:
‘भावाविण हा दिन सोन्याचा । आज उदासीन या बहिणीचा । होऊन बंधू ये रे चंद्रा । दीपांच्या राउळी ।।
मोलकरीण
सावळारामांनी जवळून काम केलेले अजून एक दिग्दर्शक म्हणजे यशवंत पेठकर. मूळचे कोल्हापूरचे असलेल्या पेठकरांना प्रथम चित्रपटसृष्टीत आणलं ते मास्टर विनायक यांनी. परंतु त्यांनी दिग्दर्शनाला सुरुवात केली ती १९४७ मध्ये प्रभात फिल्म कंपनीमध्ये. काही वर्षांनंतर त्यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शनाला सुरुवात केली.
सावळारामांनी ‘कोण कुणाचे’ (१९५३), ‘मोलकरीण’ (१९६३), ‘कधी करिशी लग्न माझे?’ (१९६५), ‘नांदायला जाते’ (१९६९), ‘माय माऊली’ (१९७१), ‘सून लाडकी या घरची’ (१९७२) या त्यांच्या चित्रपटांसाठी गीतरचना केली. ‘कोण कुणाचे’ चित्रपटाला सुधीर फडके, ‘मोलकरीण’ चित्रपटाला वसंत देसाई, ‘कधी करिशी लग्न माझे?’ चित्रपटाला राम कदम, ‘नांदायला जाते’ चित्रपटाला वसंत प्रभू, ‘माय माऊली’ चित्रपटाला विश्वनाथ मोरे, तर ‘सून लाडकी या घरची’ चित्रपटाला दत्ता डावजेकर यांचे संगीत होते.
‘देव जरी मज कधी भेटला’ आणि ‘कशी झोकात चालली कोळ्याची पोर’ ही आशा भोसले यांनी गायलेली, तसंच ‘हसले आधी कुणी तू का मी’ हे तलत मेहमूद आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं अशी या चित्रपटातली सावळारामांची गीतं खूप गाजली.
‘देव जरी मज कधी भेटला’ या गाण्याला सावळारामांना रसरंगचा फाळके पुरस्कार मिळाला. या गाण्यात सावळारामांनी एका आईच्या भावना अतिशय सुगम्य शब्दांत मांडल्या आहेत:
“देव जरी मज कधी भेटला । माग हवे ते माग म्हणाला । म्हणेन प्रभु रे माझे सारे । जीवन देई मम बाळाला ।।
सावळारामांनी ‘कशी झोकात चालली कोळ्याची पोर’ या त्यांच्या कोळीगीताच्या शब्दांतून सागरी जीवनाचं चित्र पुढे ठाकतं :
“कशी झोकात चालली कोळ्याची पोर । जशी चवथीच्या चंद्राची कोर।।
फेसाळ दर्याचं पाणी खारं । पिसाट पिऊनी तुफान वारं । उरात हिरव्या भरलं हो सारं । भरतीच्या ज्वानीला त्याहून जोर ।।
‘मोलकरीण’ चित्रपटातली इतर गाणी ग. दि. माडगूळकरांनी लिहिली होती. सावळारामांनी लिहिलेली ही गाणी माडगूळकरांच्या शैलीशी खूप मिळती-जुळती असल्यानं या गाण्यांचा उल्लेख काही ठिकाणी माडगूळकरांची गाणी म्हणून होतो.
जाताजाता सावळारामांच्या ‘सावध हरिणी सावध गं’ या ‘माय माऊली’ या चित्रगीताचा जरूर उल्लेख करावासा वाटतो. सावळारामांची बहुतांश गाणी भावनाप्रधान आणि स्त्रीमुखातून आलेली आहेत. त्यांनी ठसक्यातल्या लावण्या देखील लिहिल्या आहेत. परंतु शृंगाररस व्यक्त करणारी त्यांची प्रतिभा या गाण्यात उत्तम रीतीने प्रतीत होते:
‘सावध हरिणी सावध गं, करील कुणीतरी पारध गं । रसरसलेली तुझी ग ज्वानी, चंचल नयनी गहिरे पाणी । घातुक तुजला तुझी मोहिनी ।।
न उन्मादाचे अंगी वारे, पिसाट फिरता उरी कापरे । थरथर काळीज हलते रमणी ।।
मादक धुंदी तुझीच सगळी, दिशांत भरुनी नभात चढली । मोहाचा क्षण झापड नयनी ।। सावध हरिणी सावध गं।।’