फेसाळ दर्याचं पाणी खारं । पिसाट पिऊनी तुफान वारं । उरात हिरव्या भरलं हो सारं । भरतीच्या ज्वानीला त्याहून जोर ।।
फेसाळ दर्याचं पाणी खारं । पिसाट पिऊनी तुफान वारं । उरात हिरव्या भरलं हो सारं । भरतीच्या ज्वानीला त्याहून जोर ।।
संगीत क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी शब्द-सूर-स्वर यांचा सुरेल संगम होणं आवश्यक असतं. जवळपास २१ संगीतकारांनी सावळारामांच्या गीतांना संगीत दिलं, तर २९ गायिका आणि २१ गायकांनी त्यांची गाणी गायली. सावळारामांनी लिहिलेली चित्रगीते, भक्तिगीते, भावगीते, गवळणी आणि लावण्या यशस्वी होण्यात या सर्व संगीतकार आणि गायकांचं मोलाचं योगदान आहे. मात्र सावळारामांच्या गाण्यांनी प्रसिद्धीचा कळस गाठला, त्याला वसंत प्रभू यांचं संगीत आणि मंगेशकर कुटुंबातील लता-आशा यांचे स्वर याला फार महत्त्व आहे. त्यांचं योगदान समजण्यासाठी अधिक तपशील जाणून घेणं आवश्यक आहे.
वसंत प्रभू
सावळारामांच्या संगीत क्षेत्रातील सह-कार्यात सर्वांत प्रथम नाव येतं ते वसंत प्रभू यांचं. १९४९ ते १९६८ या १९ वर्षांच्या कालखंडात चित्रपट संगीत आणि सुगम संगीताच्या क्षेत्रात या द्वयीने एकत्र काम केलं. त्यांनी १८ चित्रपट आणि त्यातील ११२ चित्रगीतांची निर्मिती केली, तसेच सुगम संगीतात भावगीतं, भक्तीगीतं, गवळणी अशी एकूण ५८ गीतांची निर्मिती केली.
सावळाराम आणि वसंत प्रभू यांचं नातं म्हणजे शब्द आणि सूर यांचा एक सुंदर संयोग होता. दोघांच्या सह-कार्यातून अनेक अविस्मरणीय भावगीतं जन्माला आली. सावळारामांचं सरळ, गेय आणि भावपूर्ण पद्य प्रभूंच्या, अर्थ आणि भाव लक्षात घेऊन रचलेल्या चालींशी सहज जुळत असे. प्रभू शब्दांच्या छटा नीट समजून घेत; गरज भासली तर सावळारामांशी चर्चा करून सूक्ष्म बदलही सुचवत. शब्द आणि सूर यांच्यातील हा संवादच त्यांच्या अविस्मरणीय निर्मितीचा गाभा होता.
सावळाराम प्रेम, स्त्रीमन, निसर्ग आणि भक्ती अशा विषयांना सोप्या पण भावगर्भ भाषेत व्यक्त करत आणि त्या शब्दांना सुयोग्य सूर देण्याची क्षमता प्रभूंकडे होती. त्यामुळे या जोडीनं भावगीत, भक्तिगीत, गवळण आणि चित्रगीत अशा अनेक गीतप्रकारांत उल्लेखनीय निर्मिती केली. त्यांच्या गीतांत स्त्रीअनुभवांची जाण आणि भावविश्वाची कोमलता विशेष उठून दिसते.
गवळणीच्या प्रकाराला सावळारामांनी नवा आविष्कार दिला. भक्ती, शृंगार, कृष्ण–राधेची कोमलता आणि स्त्रीमनाचे दैनंदिन अनुभव त्यांनी सहजपणे शब्दांत गुंफले. वसंत प्रभूंच्या चालींनी या गीतांना लोकसंगीताचा नाद, मोहक ठेका आणि ग्रामीण जीवनाचा सुगंध दिला. शब्दांची लय आणि सुरांची गुंफण इतकी सुरेख जमली की या गवळणींना नवं रूप लाभलं.
‘गंगा-जमुना’ या भावगीतानं या जोडीच्या कार्याचा युगारंभ झाला आणि त्यातून दोघांमधल्या पुढच्या १९ वर्षांच्या घट्ट मैत्रीत रूपांतर झालं. सावळाराम दहा वर्षांनी ज्येष्ठ होते, त्यामुळे त्यांचं प्रभूंवर लहान भावासारखं प्रेम होतं. ते प्रभूंना सहसा “अरे प्रभू,” म्हणून हाक मारत, तर प्रभू मात्र “अहो सावळाराम,” असे आदरार्थी संबोधत. १९५० च्या दशकात या दोघांची जोडी सर्वाधिक तेजस्वी होती. ‘राम राम पाव्हणं’ पासून सुरू झालेली त्यांची चित्रपटसंगीताची वाटचाल आणि एच.एम.व्हीच्या भावगीतांच्या ध्वनिमुद्रिका यामुळे त्यांची गीतं घराघरांत पोहोचली. सावळारामांना प्रभूंच्या संगीतावर इतका विश्वास होता की त्यांनी बहुतेक सर्व महत्त्वाची गाणी प्रभूंकडूनच स्वरबद्ध करून घेतली.
या दोघांच्या मैत्रीचं प्रतिबिंब त्यांच्या वैयक्तिक जीवनातही उमटलं होतं. प्रभूंच्या पत्नीचं नाव वर्षा, मुलांची नावे हेमंत, शरद — ही सर्व नावे सावळारामांनीच ठेवली होती. दुर्दैवानं १९६८ मध्ये प्रभूंचं अकाली निधन झालं. त्यांच्या मृत्यूनं सावळारामांची मैफिल सुनी झाली. पण त्यांच्या संयुक्त प्रतिभेचे अमर सूर आजही मराठी घरांत ऐकू येते.
सावळारामांचा कवित्वाचा ओघ आणि प्रभूंची परिपक्व संगीतदृष्टी या संयुक्त प्रतिभेतून जन्मलेली अनेक भावगीते, भक्तिगीते आणि गवळणी आजही जनमानसांत विराजमान आहेत. त्यांच्या सर्जनशील मैत्रीने मराठी संगीतजगताला जी अमूल्य गीतांची देणगी दिली, तिचा गोडवा आजही टिकून आहे.
मंगेशकर कुटुंब
सावळारामांच्या यशात दुसरा मोठा वाटा मंगेशकर कुटुंबाचा होता. लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या सुमधुर स्वरांतून सावळारामांची गाणी घराघरांत पोहोचवली. मंगेशकर घराण्यानं चित्रगीतं आणि सुगम संगीत मिळून सावळारामांची तब्बल १८६ गाणी (४१ भावगीते आणि १४५ चित्रगीते) गायली. सावळारामांच्या काव्यप्रतिभेला लोकमान्यता मिळवून देण्यासाठी मंगेशकर कुटुंबाचं स्वरसंस्कारित आणि जादुई गायन कारणीभूत ठरलं. त्यांच्या आवाजामुळेच सावळारामांची अनेक गाणी आजही ‘अक्षय’ मानली जातात.
सावळाराम यांच्या गीतलेखनातील माधुर्य, भावनांचं कोमल चित्रण आणि दैनंदिन जगण्याशी जोडलेला हृदयस्पर्शी संबंध, हे सर्व रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं भाग्य त्यांना मंगेशकर कुटुंबाच्या सुरेल कंठामुळे मिळालं. त्यामुळे सावळारामांचं काव्य पुस्तकात राहिलं नाही; ते सामान्यजनांच्या ओठांवर रुळलं. स्वतः सावळारामदेखील त्यांच्या यशाचं मोठं श्रेय वसंत प्रभूंबरोबर लता मंगेशकर आणि आशा भोसले यांना देतात.
भावगीतांना अमरत्व देणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सावळाराम यांच्या ७४ गीतांना आपला सुरेल आवाज दिला. त्यांच्या आवाजातील माधुर्यामुळे सावळाराम यांचं नाव मराठी भावगीतविश्वात गाजलं.
‘गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का?’ — महाराष्ट्राच्या संस्कृतीत समरस झालेलं हे गीत आजही आई–मुलीच्या भावविव्हल क्षणांचं प्रतीक मानलं जातं. वादळ चित्रपटातील ‘नसती झाली भेट तुझी ती, नसते मी हसले’ हे विरहगीत, आई–मुलगी नात्याचे हृदयस्पर्शी चित्र उभे करणारे कन्यादान चित्रपटातील ‘लेक लाडकी या घरची’ ही चित्रपट गीते अतिशय गाजली. तर गैर-चित्रपट गीतांमध्ये, ‘हसले गं बाई हसले’, ‘तुझे डोळे पाण्याने भरले’, ‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला’, ‘विठ्ठल तो आला आला’ यांसारखी भावगीतं आणि भक्तिगीतं कमालीची गाजली.
सावळाराम यांची सर्वाधिक गाणी गायलेली ती आशा भोसले यांनी. त्यांनी सावळारामांची तब्बल ८० गीते गायली. आशा भोसले यांच्या खट्याळ, शृगांरिक, भावनाप्रधान अशा आवाजाच्या विविध छटांमधून सावळारामांची भक्तीगीतं, भावगीतं, गवळणी, लावणी, इत्यादी गीतप्रकारांना पुरेपूर न्याय मिळाला.
आशा भोसले यांची लय–ताल–भावांनी भारलेली ‘पंढरीनाथा झडकरी आता’, ‘ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता’, ‘धागा धागा अखंड विणूया’, ‘कशाला जाऊ मी पंढरपुरी’ ही भक्तिगीतं, तर ‘राधा गौळण करिते मंथन’, ‘उठी गोविंदा उठी गोपाळा’, ‘मजवरी माधव रूसला बाई’ या गवळणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत.
मीना मंगेशकर-खडीकर यांनी सावळाराम यांच्या १५ चित्रगीतांना स्वर दिला. त्यांच्या आवाजातील साधेपणा काही गाण्यांना वेगळाच गोडवा देऊन गेला. त्यांचं विशेष उल्लेखनीय गीत म्हणजे ‘राम राम पाव्हणं’ आणि चित्रपटातलं ‘माझ्या शेतात सोनंच पिकतंय.’
उषा मंगेशकर यांनीही सावळाराम यांची १२ चित्रगीतं गाऊन, त्यांच्या चित्रपटगीतांना लोकप्रियतेचा विशिष्ट रंग मिळवून दिला. त्यांचा आवाज तरल, स्वच्छ आणि भावनांना भिडणारा होता.
हृदयनाथ मंगेशकरांनी सावळारामांची ५ चित्रगीतं गायली. त्यातलं ‘मानसीचा चित्रकार तो’ हे त्यांनी गायलेलं गीत आजही अप्रतिम मानलं जातं—भावार्थाच्या गाभ्यापर्यंत पोहोचणारी जणू एक स्वरमैफिल.
शब्द–स्वर–आवाज या त्रिसूत्रीचा मागोवा घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, सावळारामांच्या गीतविश्वाला आकार देण्यात इतर कलावंतांचा मोठा वाटा होता. त्यांच्या काव्यरचनेला सुरांचा आत्मा देणारे वसंत प्रभू आणि त्या सुरांना लोकांच्या मनात रुंजी घालायला लावणारे मंगेशकर कुटुंबाचे स्वर—या दोन स्तंभांवर सावळारामांच्या गीतनिर्मितीची उभारणी झाली. शब्दांच्या भावार्थाशी सुसंगत चाल आणि त्या चालीला पूर्णत्व देणारी सुमधुर गायकी—यातून त्यांची गीते लोकप्रिय झाली. त्यांच्या गीतांचा टिकून राहिलेला प्रभाव हीच या त्रिसूत्रीच्या यशाची वस्तुनिष्ठ साक्ष आहे.