“देव जरी मज कधी भेटला । माग हवे ते माग म्हणाला । म्हणेन प्रभु रे माझे सारे । जीवन देई मम बाळाला ।।
“देव जरी मज कधी भेटला । माग हवे ते माग म्हणाला । म्हणेन प्रभु रे माझे सारे । जीवन देई मम बाळाला ।।
मराठी भावगीतांना स्वतंत्र, तरल आणि गेय भाषा देण्यात सावळारामांचं मोठं योगदान आहे. भक्तिगीतांच्या ओघात भावगीतांकडे वळताना त्यांच्या कविमनाचं दुसरं रूप पाहायला मिळतं.
प्रेम, स्त्री–पुरुष नात्यांतील लाज–संकोच–आकर्षण, आठवणींचा ओलावा, निसर्गसौंदर्य आणि मनाची गुंतागुंत यांसारख्या अनेक भावछटांना त्यांनी कवितेतून स्पर्श केला. त्यांची भावगीतं सहज, सरळ, पण भावनांनी ओतप्रोत आहेत. त्यांच्या भावगीतांची भाषा सोपी, मधुर, गेय आहे. शब्दांचा अनावश्यक क्लिष्टपणा नाही. यामुळेच ही भावगीतं लोकाभिमुख झाली.
सावळारामांच्या गीतांमधील स्त्री-भावना हा एक स्वतंत्र अध्याय आहे. स्त्रीच्या मनातील लज्जा, प्रेमाची कोमलता, रुसवे–फुगवे, आयुष्यातील आशा, आकांक्षा, उदासीनता, संसाराचे ओझे, हे सारं सावळाराम विलक्षण संवेदनशीलतेनं काव्यात उतरवत.
त्यांच्या भावगीतांत स्त्री ही कधी वधू आहे, कधी विरहिणी, कधी रुसलेली प्रेयसी, तर कधी घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेली गृहिणी. स्त्रीच्या प्रत्येक रूपाचं सूक्ष्म निरीक्षण आणि समर्पक वर्णन ही त्यांच्या भावगीतांची खासियत आहे.
सावळारामांच्या प्रेमगीतांचा सूर कधीही उथळ नसतो. प्रेमातील शालीनता, संवेदनशीलता, संकोच यांचं त्यांनी रेखाटलेलं वर्णन मराठी भावगीत विश्वाला एक वेगळा दर्जा, उंची देऊन जातं. त्याचबरोबर निसर्ग आणि मन यांचं नातंही सावळारामांच्या भावगीतांतून सुंदर रीतीने जुळून आलं आहे.
वसंत प्रभूंसोबतचा त्यांचा अद्वितीय संयोग / दृढ सहवास ही या भावगीतांची सर्वांत मोठी ताकद आहे. दोघांचे शब्द आणि सूर घट्ट जुळले आणि गाणं सहज-सुंदर बनत गेलं. या गीतांपैकी बहुसंख्य गीतांना प्रभूंचंच संगीत आहे, हे संख्येवरून स्पष्ट होतं.
भावगीताची खरी ताकद ही ‘गायल्यावर उमलणाऱ्या शब्दांची’ असते. सावळारामांची गीतं लयीत असत. त्यांची गीतं गाणाऱ्याला सोपी, ऐकणाऱ्याला भावुक करणारी आणि लक्षात राहणारी असत. म्हणूनच ही गीते आजही तितकीच ताजी, हळवी आणि रसिकांच्या हृदयात टिकून राहिलेली आहेत.
हसले गं बाई हसले
‘हसले गं बाई हसले’ हे वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेलं आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत सावळारामांच्या विनोदी, खोडकर आणि नाजूक भावनांचं एक सुंदर उदाहरण ठरतं. स्त्रीमनातील पहिली ऊर्मी, पहिलं आकर्षण आणि त्यातून निर्माण होणारा मनातील गोंधळ—हे सारं गीतात अतिशय समर्पकपणे आलं आहे. प्रेम आणि खट्याळपणा यांचं सुरेख मिश्रण असलेल्या या गाण्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत खट्याळ संवाद, लाजरा भावस्पर्श भरलेला दिसून येतो.
हसले गं बाई हसले अन् कायमची मी फसले ।।
नयनकवडसा टाकून कुणीतरी, दिपवी माझे लबाड डोळे । प्रीतमधाचे सुंदर पोळे, हृदयी शिरूनी चोरून नेले ।।
सांगायाची चोरी झाली, आई विचारी काय जाहले ।
चिडले, रुसले माझ्यावर मी मलाच होते हरवून बसले ।।
पाळत ठेवून त्या लुच्च्याला, धरूनी बांधुनी खेचित नेले ।
वाजत गाजत कैदी केले, शासन करिता घरास मुकले।।
वसंत प्रभूंनी या गीताला दिलेली चपळ, नाजूक लय नायिकेच्या खेळकर भावनेला अचूक पकडते. लता मंगेशकरांचा स्वर गीतातील लाजरेपणा, खट्याळपणा आणि निरागसपणा सहजसुंदरपणे मांडून जातो.
मुली तू आलीस अपुल्या
वसंत प्रभूंनी स्वरबद्ध केलेलं, लता मंगेशकरांनी गायलेलं ‘मुली तू आलीस अपुल्या’ हे गाणं म्हणजे नव्या घरात आलेल्या सुनेचा पहिला दिवस, तिच्या मनातील लाज, संकोच, भीती आणि सासूने तिला दिलेला प्रेमाचा, स्वीकाराचा आणि आईसारखा आधार. गीतात प्रेम आहे, ऊब आहे. त्या दोघींमध्ये निर्माण होत असलेलं जिव्हाळ्याचं नातं गाण्यातून जिवंत होतं. नव्या सुनेला दिलासा देणारी प्रेमळ सासू चित्रित करणारे सावळारामांच्या गीतातील शब्द डोळ्यांसमोर हुबेहूब प्रसंग उभा करतात.
लिंबलोण उतरता अशी का, झालीस ग बावरी ।
मुली तू, आलीस अपुल्या घरी ।।
हळदीचे तव पाऊल पडता, घरची लक्ष्मी हरखुन आता सोन्याहून गं झाली पिवळी ।
मांडवाला कवळुन चढली, चैत्रवेल ही वरी ।।
भयशंकित का अजुनी डोळे? । नको लाजवू सारे कळले । लेकीची मी आहे आई, सासुरवाशिण होऊन मीही, आले याच घरी ।।
याच घरावरी छाया धरुनी । लोभ दाविती माय पक्षिणी ।
हसते घर हे तुझ्या दर्शनी । सुखव मलाही आई म्हणुनी, बिलगुनी माझ्या उरी ।।
बाळा, होऊ कशी उतराई ?
आई आपल्या लहान बाळाला जवळ घेऊन त्याच्याकडे पाहत मनोमन म्हणते—
“बाळा, मी तुझी कशी उतराई होऊ? तू माझ्या आयुष्यात आलास म्हणूनच मी ‘आई’ झालेय.”
बाळाला मिठी मारताना, त्याच्या मुखाचं प्रेमानं चुंबन घेताना तिच्या मनात प्रचंड ममत्व दाटून येतं. बाळाला दूध पाजताना तिला जणू स्वतःच्या मनाचा आणि बाळाच्या मनाचा संगम झाला आहे आणि मायेची भूक जाणणारा विश्वाचा निर्माता जणू तिच्या पोटी जन्माला आलाय असं वाटतं. बाळाच्या मुखातून येणारा ‘आई’ या शब्दाचा उच्चार ऐकता आईला तिचे अस्तित्व जणू देवाहूनही थोर, पवित्र वाटते.
बाळा होऊ कशी उतराई ? तुझ्यामुळे मी झाले आई ।।
तुझ्या मुखाचे चुंबन घेता, हृदयी भरते अमृत सरिता तव संजीवन तुला पाजिता, संगम होतो उगमा ठायी गाई झुरुझुरू तुज अंगाई ।।
माय भुकेला तो जगजेठी, तुझ्या स्वरूपी येऊन पोटी मंत्र ‘आई’ जपता ओठी, महान मंगल देवाहुन मी मातृदैवत तुझेच होई ।।
लता मंगेशकरांचा स्वर या गीतात खरोखर आईचं रूप धारण करतो. त्यांच्या आवाजातील कोमलता गाण्यातील शब्दांना जिवंत करते.
तुझे डोळे पाण्याने भरले
‘तुझे डोळे पाण्याने भरले, माझे डोळे पाण्याने भरले, डोळे पाण्याने भरले’ हे सावळारामांचं काव्य त्यांच्या विशाल प्रतिभेचं द्योतक ठरतं.
प्रियकर आणि प्रेयसी यांच्यात दुरावा आलेला असताना दोघांमधली प्रीतीची कोमल भावना त्यांना मिठीत घेऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करते. प्रियकर आणि प्रेयसी यांच्यातला अबोला तसाच राहतो आणि अखेर नाईलाजाने प्रीती दोघांना सोडून निघू लागते. परंतु प्रीतीचा विरह दोघांच्या मनाला सहन होत नाही. त्यावर क्षणभर थबकून प्रीती त्यांना समजावते— “झाले गेले, विसरा सगळे, विसरा सगळे.”
इथे सावळारामांनी प्रेमाला आणि मनाला स्वतंत्र अस्तित्व दिलं आहे. प्रेम आणि मन यांच्यातला संवाद उलगडत काव्य घडवलं आहे. ‘तुझे डोळे पाण्याने भरले’ हे सावळारामांचं काव्य त्यांच्या विशाल प्रतिभेचं द्योतक ठरतं.
हृदयी जागा, तू अनुरागा
‘हृदयी जागा, तू अनुरागा’ हे वसंत प्रभूंनी स्वरबद्ध केलेलं, लता मंगेशकर यांनी गायलेलं प्रेमगीत सावळारामांनी प्रेमी युगुलांचा सुखी संसार डोळ्यांसमोर उभा केला आहे.
हृदयी जागा, तू अनुरागा, प्रीतीला या देशील का ? ।।
बांधिन येथे घरकुल चिमणे, स्वर्गाचे ते रूप ठेंगणे । शृंगाराचे कोरीव लेणे, रहावयाला येशील का? ।।
दोन मनांची उघडी दारे, आत खेळते वसंत वारे ।
दीप लोचनी सदैव तू रे, संध्यातारक होशील का? ।।
घराभोवती निर्झर नाचे, जाणुन अपुल्या गूढ मनाचे
झाकुन डोळे एकांताचे, जवळी मजला घेशील का ? ।।
प्रेमी युगुलांचं असंच अजून एक सुरेख प्रेमगीत म्हणजे सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं ‘असावे घर ते अपुले छान’. या गीताचं संगीत दशरथ पुजारी यांनी दिलं होतं. या गीतातही प्रेमी युगुलांचा सुंदर संसार सावळारामांनी उभा केला आहे.
असावे घर ते अपुले छान।। पुढे असावा बागबगीचा ।
वेल मंडपी जाईजुईचा । आम्रतरूवर मधुमासाचा ।
फुलावा मोहर पानोपान ।।
संगमरवरी ती पुष्करणी । त्यात असावे गुलाबपाणी । पाण्यामधुनी कारंजाची । फुटावी सुरेल सुंदर तान ।।
फुलासारखे मूल असावे । नित्य चांदणे घरी हसावे ।
तीर्थरूपे ओवाळावे । अपुले जीवन पंचप्राण।।
सावळारामांच्या भावगीतांचा हा प्रवास भावनाप्रधान आणि विस्तीर्ण आहे. त्यांच्या लेखणीतून जन्मलेल्या असंख्य गीतांनी मराठी रसिकांच्या मनात कायमचं घर केलं आहे. प्रेम, कोमलता, खट्याळपणा, निसर्ग, स्त्रीमन—या सगळ्या भावछटांना त्यांनी शब्दांत अचूक उतरवलं आहे. त्यांच्या भावगीतांची संख्या खूप मोठी आहे; उपलब्ध सूचीवरूनच त्यांची विपुलता दिसून येते. पण येथे सर्व गीतांचा तपशीलवार ऊहापोह करणे शक्य नाही. त्यामुळे येथे ज्यांची चर्चा झाली ती निवडक गीते त्यांच्या काव्यविश्वाची एक झलक म्हणून घ्यावी. बाकी अनेक गीते तितकीच ताजी, भावस्पर्शी आणि मनाला भिडणारी आहेत.