कशी झोकात चालली कोळ्याची पोर । जशी चवथीच्या चंद्राची कोर।।
कशी झोकात चालली कोळ्याची पोर । जशी चवथीच्या चंद्राची कोर।।
मराठी गीतलेखनात सावळाराम यांनी अनेक काव्यप्रकार हाताळले. त्यात चित्रगीत, भक्तिगीत, भावगीत, गवळण, लावणी, लोकनाट्यगीत इत्यादी प्रकारांचा समावेश होतो. सावळारामांनी लिहिलेली चित्रगीतं, भक्तिगीतं आणि भावगीतं आपण पाहिली. त्यांनी लिहिलेली गवळण आणि लावणी यांचा संक्षिप्त आढावा इथे घेऊया.
गवळण
सावळारामांनी लिहिलेल्या गीतप्रकारांत एक विशेष आणि महत्त्वाचा प्रकार म्हणजे गवळण. कृष्ण–राधा यांच्यातील प्रेमभावना, स्त्रीमनातील ओढ आणि भक्तिभावाचा नाजूक संगम असलेला हा प्रकार मराठी लोकसंस्कृतीत पूर्वीपासूनच लोकप्रिय होता. पण सावळारामांनी या परंपरेला नवी शब्दसंपदा आणि भावनांची सूक्ष्मता जोडून गवळणीला सुशिक्षित, शहरी श्रोत्यांची देखील आवडती शैली बनवून टाकली.
गवळण हा मुळात कीर्तनपरंपरेतील एक प्रकार आहे. कीर्तनकार भक्तिभावाची शिकवण प्रभावीपणे मांडण्यासाठी नाट्यपूर्ण आणि बोलक्या शैलीतलं लयबद्ध गीत सादर करत. हेच गीत पुढे ‘गवळण’ म्हणून विकसित झालं. गोपिकांचं जग, कृष्णाबरोबरच्या लीला, विरह, ओढ, हे भाव नादमधुर, ओघवत्या आणि सहजपणे संगीतात बसणाऱ्या भाषेत मांडले जायचे.
परंपरागत गवळणीत कथानाट्याचा अंश अधिक असायचा. सावळारामांनी यात भावना, कोमलता आणि आध्यात्मिक विचारांची भर टाकली. त्यांच्या रचनांमध्ये राधा–कृष्णाचं प्रेम केवळ शृंगारिक न राहता भक्तीत परिवर्तित व्हायचं. शृंगारातून भक्तीकडे जाणारा हा संक्रमणाचा प्रवास त्यांच्या गवळणींना वेगळेपण देऊन जायचा.
सावळारामांच्या बहुतेक गवळणींना वसंत प्रभूंनी संगीत दिलं. शब्द आणि सूर यांचा हा संगम इतका मनोरम झालेला दिसतो की दोघेही एकमेकांत विलीन झाल्याचा भास होतो. वसंत प्रभूंनी सावळारामांच्या एकूण दहा गवळणींना संगीत दिलं. हा आकडा त्यांच्या परस्परांतील जवळच्या कलासहवासाचं द्योतक म्हणून दिसून येतो.
लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचे स्वर लाभल्यामुळे या गवळणींनी थेट घराघरांत प्रवेश केला. लता मंगेशकरांच्या आवाजातील कोमलता आणि आशा भोसलेंच्या आवाजातील नादमाधुर्य — हे दोन्ही सावळारामांच्या शब्दांशी सहज जुळून येऊन या प्रकाराला लोकप्रियतेचा नवा शिखरबिंदू मिळाला.
वसंत प्रभूंनी स्वरबद्ध केलेलं आणि आशा भोसले यांनी गायलेलं सावळारामांचं ‘मजवरी माधव रुसला बाई’ हे गीत गवळणीचं उत्कृष्ट उदाहरण आहे. राधा व्याकुळ झाली आहे, कृष्ण तिच्यावर रुसला आहे आणि त्यानं तिच्याशी अबोला धरला आहे. त्याला प्रसन्न करण्यासाठी ती सर्व प्रयत्न करते. त्याच्या सोन्यासारख्या पावलांना स्वतःच्या अश्रूंनी धुऊन काढते, त्याच्या करकमलांची पूजा करते. तरीदेखील कृष्णाचा राग हटत नाही. त्यावर राधा कृष्णाला प्रश्न करते, ‘अनंत हृदये तू चोरलीस, कुणी त्याचा राग मानला नाही; मग माझ्यावरच तू इतका का रुसलास?’ यात गवळणीचा आत्मा, राधेची ओढ, कृष्णावरील भक्तिशृंगार आणि नाजूक भावस्पर्शी संवाद पूर्णपणे जाणवतो.
वसंत प्रभूंनी स्वरबद्ध केलेलं आणि आशा भोसले यांनी गायलेलं सावळारामांचं ‘राधा कृष्णावरी भाळली’ हे गीतदेखील गवळणीचा उत्कृष्ट नमुना आहे. राधा कृष्णावर भाळली आहे आणि तिच्या प्रेमाची बातमी गोकुळात पसरली आहे. जणू निसर्गही तिच्या प्रेमात सहभागी झाला आहे. अमृताच्या वृक्षाला मोहोर आला आहे. कोकिळेच्या गोड गाण्याने वातावरण भरून गेलं आहे. राधेची भक्तीची हाक यमुनेपर्यंत पोहोचते. त्या हाकेमुळे नदीत निळ्या लाटा उसळू लागल्या आहेत. कृष्णाची अमर प्रीती ओठांवरील बासरीतून वाहत आहे. राधा–माधवाच्या मिलनाचा आनंद पाहण्यासाठी जणू इंद्रपुरीच पृथ्वीवर उतरली आहे.
सावळारामांच्या अतिशय गाजलेल्या गवळणींपैकी एक म्हणजे ‘रिमझिम पाऊस पडे सारखा!’ वसंत प्रभूंनी स्वरबद्ध केलेलं आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत रसिकांनी डोक्यावर उचलून घेतलं. हे गीत राधेच्या व्याकुळतेचं, प्रेमाच्या ओढीचं आणि पावसाळी निसर्गातील तिच्या एकाकीपणाचं नाजूक चित्र रेखाटतं. सावळाराम लिहितात,
रिमझिम पाऊस पडे सारखा । यमुनेलाही पूर चढे । पाणीच पाणी चहूकडे, गं बाई । गेला मोहन कुणीकडे ।।
तरुवर भिजले भिजल्या वेली । ओली चिंब राधा झाली । चमकून लवता वरती बिजली । दचकून माझा ऊर उडे । गं बाई गेला मोहन कुणीकडे ।।
हाक धावली कृष्णा म्हणूनी । रोखुनी धरली दाही दिशांनी । खुणाविता तुज कर उंचावुनी । गुंजत मंजुळ मुग्ध चुडे । गं बाई गेला मोहन कुणीकडे ।।
जलाशयाच्या लक्ष दर्पणी । तुझेच हसरे बिंब पडे । हसता राधा हिरव्या रानी । पावसातही ऊन पडे । गं बाई गेला मोहन कुणीकडे ।।
लावणी
गवळण या काव्यप्रकारावर चर्चा केल्यानंतर लावणी या शृंगारप्रधान आणि लोककलाभिमुख प्रकाराचा उल्लेख आवश्यकच आहे. मराठी रंगभूमी, लोकनाट्य आणि चित्रपटसंगीत—या सर्व क्षेत्रांना लावणीने दिलेलं योगदान आजही ताजं आहे. लोकमानसात रुजलेल्या या प्रकाराला अनेक कवींनी आपापल्या शैलीने समृद्ध केलं. या परंपरेत सावळाराम यांनीदेखील आपल्या सहज, शब्दसमृद्ध आणि रसाळ लेखणीतून एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं.
मराठीतील लोकगीतांत काव्य–संगीत–नृत्य–अभिनय यांच्या संगमातून विकसित झालेली मनोरंजनाची आणि प्रबोधनाची परंपरा आहे. यात भारुडे, पोवाडे, ओव्या, गवळणी आणि लावणी यांसारख्या प्रमुख लोकगीतांचे स्थान आहे. लावणी ही शाहिरी परंपरेशी जोडलेली आहे. तिची मुळे तमाशा, लोकनाट्य, फड, पथनाट्य अशा विविध लोककलांत आढळतात. होनाजी बाळा, रामजोशी, आदींच्या लावणीत शृंगार, तरुण भावना, प्रेमाचे नाजूक रंग आणि नृत्याशी जोडलेली चपळ लय दिसतेच.
या प्रकाराचा मूलस्वर शृंगार असला तरी तो केवळ देहभानाचा नाही; तर तो स्त्रीमनातील हुरहूर, ओढ आणि भावविश्वातील नाजूक छटा व्यक्त करणारा स्वर आहे.
सावळारामांनी आपल्या व्यापक गीतलेखनात भावगीत, भक्तिगीत, चित्रगीत यांसोबतच लावणी हाही प्रकार प्रभावीपणे हाताळला. परंपरागत लावण्या उत्तान शृंगार व्यक्त करतात. परंतु सावळारामांनी देखील शृंगाराला एक कोमल, सुसंस्कृत आणि हृदयस्पर्शी रूप दिलं. त्यांच्या लावणीत देहापेक्षा भावनेचं सौंदर्य अधिक महत्त्वाचं ठरतं. चित्रपट आणि लोकनाट्याच्या प्रसंगानुसार त्यांनी लावणीला नाटकाच्या प्रवाहात सहजगत्या बसवलं.
सावळारामांचे शब्द सर्वसामान्यांच्या बोलीतील, पण काव्यगुणांनी परिपूर्ण असतात. त्यांची लावणी गेय, लयबद्ध आणि लगेच लक्षात राहणारी असते. त्यांच्या लावणीत प्रेमातील खट्याळपणा आणि निरागसता, नायिकेची खोडकर शैली, तिचं स्वप्नरंजन, प्रियकराशी संवाद, या भावछटा सहज उमटतात. लज्जा, ओढ, अपेक्षा, अभिमान, विरह या स्त्रीमनाच्या भावना सावळाराम अत्यंत आदराने आणि तरलपणे व्यक्त करतात.
गवळण हा कृष्ण–राधा परंपरेतील भक्तिमिश्रित काव्यप्रकार; तर लावणी ही शृंगारप्रधान, नृत्यनाट्याशी जोडलेली शैली. या दोन भिन्न प्रवाहांना सावळारामांनी त्यांच्या काव्यात सुंदरपणे जोडलं. गवळणीतून त्यांनी भक्ती, विरह आणि राधेची मानसिक ओढ व्यक्त केली. तर लावणीतून त्यांनी प्रीती, ओढ आणि सौंदर्याचा आविष्कार घडवला. दोन्ही प्रकारांमध्ये त्यांची शैली एकाच धाग्याने बांधलेली दिसते—बोलीभाषेतली साधे शब्द, शालीन शृंगार आणि भावनेची चमक.
सावळारामांनी अनेक चित्रपटांमध्ये लावणी लेखन केलं. ‘राम राम पाव्हणं’ (१९५०), ‘पाटलाचा पोर’ (१९५१), ‘कन्यादान’ (१९६०), ‘शिकलेली बायको’ (१९५९) यांसारख्या चित्रपटांत त्यांच्या लावण्यांचा समावेश आहे. लावणीमध्ये अपेक्षित स्त्रीतील खट्याळपणा सावळारामांनी अनेक लावण्यांमध्ये मांडला आहे.
‘तुला बघून पदर माझा पडला’ या लावणीत ते लिहितात —
‘तुला बघून पदर माझा पडला । तुझ्या पिरतीचा रोग मला जडला । जरा डोळा होता माझा लागला । राती सपनामधि तुम्ही माझ्या आला । बागेमधला गुलाब तुम्ही खुडला ।।’
‘गुटुघूम गुटुघूम’ या लावणीत पैलवान प्रियकराचं वर्णन करताना ते लिहितात —
‘गळ्यात पेटी, डोईवर फेटा । मिशीचा आकडा, दरारा मोठा । डोळ्यापुढं चित्तर दिसतंय, खंगतंय।।’
‘माझ्या पदराचा वंगाळ वारा’ या लावणीत स्त्रीनं एका कोवळ्या तरुणाला दिलेला इशारा देताना ते लिहितात —
‘नको लागू तू नादाला पोरा । नाही मिसरूड फुटली ओठी । नको लागूस माझ्या पाठी । मी न माझी न कुणासाठी । माझ्या पदराला गाठी ।।’
शृंगारप्रधान लावणीला सावळारामांनी शालीन आणि रसिक स्पर्श दिला. परंपरेतील ठसठशीत लय जपत त्यांनी स्त्रीमनातील हुरहूर, खेळकरपणा आणि प्रीतीची नाजूक चलबिचल सहज शब्दांत व्यक्त केली. त्यामुळे सावळारामांची लावणी देहस्वरूपाच्या पलीकडे जाऊन भावनांची लय बनते. गवळण आणि लावणी या दोन भिन्न प्रवाहांना जोडत मराठी गीतकाव्याला एक वेगळा, भावस्पर्शी आयाम देते.