जीवित माझे हवे तुला, घेऊन जा तू आता । सुवासिनीचे कुंकू हिरावून नकोस नेऊ नाथा ।।
जीवित माझे हवे तुला, घेऊन जा तू आता । सुवासिनीचे कुंकू हिरावून नकोस नेऊ नाथा ।।
सावळारामांचं व्यक्तिमत्त्व फक्त जनकवी म्हणूनच नव्हे, तर बहुआयामी कलावंत म्हणूनही उठून दिसतं. तमाशा, लोकनाट्य, चित्रपट, आकाशवाणी आणि साहित्य, अशा सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या प्रतिभेची स्वतंत्र छाप पाडली आहे. त्यांच्या विविध कलाविष्कारांचा आणि सामाजिक जाणिवांनी प्रेरित साहित्यनिर्मितीचा संपूर्ण आढावा येथे घेतला आहे.
मराठी साहित्य संमेलन, ठाणे
१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. त्याच वर्षी संयुक्त महाराष्ट्राचं पहिलं आणि क्रमांकाने बावीसावं साहित्य संमेलन ७ मे रोजी ठाणे येथे भरलं. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रा. रा. श्री. जोग यांची निवड झाली. चुरशीच्या निवडणुकीत लोकप्रिय विनोदी लेखक चिं. वि. जोशी यांचा पराभव करून जोग अध्यक्षपदावर निवडून आले.
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून ठाण्याचे ॅडव्होकेट वामनराव ओक यांची निवड झाली होती. ‘ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालय’ या संस्थेने कार्यक्रमाच्या नियोजनाची आणि अंमलबजावणीची जबाबदारी घेतली होती. सावळारामांना या संमेलनाचे कार्योपाध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं. कार्यक्रमाच्या प्रत्येक गोष्टीत त्यांचा संपूर्ण सहभाग होता.
संमेलनाची सुरुवात सावळारामांनी लिहिलेल्या ‘सारस्वत मंदिरात माझी मराठी आज येत, जयविजयाची सुमने उधळित, बोला सुस्वागत, सुस्वागत’ या स्वागतगीताने झाली. संमेलनाच्या निमित्ताने अनेक कवींच्या कवितांचा ‘कोरीव लेणी’ नावाचा प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशित करण्यात आला. त्या संपादक मंडळात सावळारामांचा सहभाग होता. या कवितासंग्रहाचं प्रकाशन संमेलनाध्यक्ष प्रा. रा. श्री. जोग यांच्या हस्ते झालं.
पुढे १९८८ साली ठाणे येथे पुन्हा झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही सावळारामांचा सहभाग होता. या संमेलनात होणाऱ्या कविसंमेलनाचे अध्यक्ष व सूत्रसंचालक म्हणून त्यांची निवड झाली होती.
तमाशा परिषद
सावळाराम यांना तमाशा कलावंतांविषयी खास जिव्हाळा होता. येडेनिपाणीतील बालपणातच त्यांना तमाशाचा परिचय झाला होता. पुढे मोठेपणी कलावंतांची हालअपेष्टा, समाजाची उदासीनता, त्यांच्यावरचे अन्याय आणि कुटुंबांची होत असलेली आबाळ याचं वास्तव त्यांना प्रकर्षाने जाणवलं. तमाशा कलावंतांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी बरंच काम केलं.
१९६३ मध्ये झालेल्या तमाशा परिषदेच्या चौथ्या अधिवेशनात सावळारामांची अध्यक्षपदी एकमतानं निवड झाली. तमाशा कलावंतांनी त्यांच्यावरील विश्वास आणि जिव्हाळा व्यक्त करत हे पद त्यांना आपुलकीने अर्पण केलं. त्यांच्या कलाजीवनातील हा खरा गौरवाचा क्षण होता.
३१ मे १९६३ रोजी सांगलीतील भावे नाट्यमंदिरात हे अधिवेशन सुरू झालं. महाराष्ट्राचे त्या काळचे मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांनी उद्घाटन केलं. स्वागताध्यक्ष म्हणून शंकरराव निकम कार्यरत होते. महिला मेळाव्याचं नेतृत्व सौ. प्रभावती झाडबुके यांनी केलं. अधिवेशनाचा समारोप करण्याची जबाबदारी राज्याचे कृषिमंत्री बाळासाहेब देसाई यांना देण्यात आली होती.
सावळारामांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात तमाशातील बदल, त्याच्या जिवंतपणाचे स्रोत आणि कलावंतांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला. ‘नाच्या’ची परंपरा लयाला गेल्याने रंग कमी झाल्याचं त्यांनी नमूद केलं. सोंगाड्याच्या हजरजबाबीपणातच तमाशाचं चैतन्य दडलंय, असं ते म्हणाले. तमाशा ही लोककला असून तिच्या व्यावसायिक उन्नतीसाठी संघटना आणि सहकार्य आवश्यक आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. सरकारी मान्यता मागण्यापेक्षा कलावंतांनीच सामूहिक प्रयत्न करून आपली प्रतिष्ठा उंचावावी, असं सांगून त्यांनी पठ्ठे बापूरावांसारख्या महान कलावंतांचं स्मरण करून प्रेरणा दिली.
परिषद दोन दिवस उत्साहात पार पडली. सावळारामांच्या हस्ते तमाशातील अनेक स्त्री–पुरुष कलावंतांचा गौरव झाला. महिला मेळाव्याच्या अध्यक्षा सौ. प्रभावती झाडबुके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. विविध कलावंतांनी आपली रंगतदार कला सादर केली. सर्वांना प्रशस्तिपत्रके देऊन सन्मानित करण्यात आलं. शेवटी महाराष्ट्राचे कृषिमंत्री बाळासाहेब देसाई यांच्या उपस्थितीत परिषदेचा समारोप झाला आणि दोन दिवसांचं अधिवेशन यशस्वीपणे पूर्ण झालं.
मुंबईच्या हनुमान थिएटरचे मधूशेठ नेराळे हे सावळारामांचे जिवलग मित्र होते. तमाशा कलावंतांच्या प्रश्नांवर त्यांची दोघांचीही नेहमी चर्चा होत असे. १९७२ च्या सुमारास मधूशेठ यांनी ‘तमाशा कला–कलावंत विकास मंदिर’ ही संस्था स्थापन केली. तमाशासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या अनेक कलावंतांकडे कुटुंबासाठी वेळ उरत नसे, त्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर संकटं येत. या कुटुंबांना शिक्षण आणि इतर मदत उपलब्ध करून देणं हा संस्थेचा मुख्य उद्देश होता.
कलावंतांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी संस्थेने महाराष्ट्रात विविध मेळावे घेतले. या संस्थेचे पहिले अध्यक्ष सावळाराम होते, तर कार्याध्यक्ष मधूशेठ नेराळे होते. सरकारदरबारी सावळारामांचं वजन असल्यामुळे अनेक कलावंतांचे प्रश्न सोडवण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली.
सुमारे तीन वर्षे त्यांनी ही जबाबदारी निभावली आणि अनेक गरजू कलावंतांना मदत केली. तमाशातील कलावंतांची सावळाराम आस्थेनं चौकशी करत. त्यांना वेळोवेळी मदतीचा हात देत. यमुनाबाई वाईकर, राधाबाई बुधगावकर, अप्पासाहेब इनामदार अशा तमाशातल्या मंडळींची सावळारामांच्या ठाण्याच्या घरी ये-जा असे.
१९७५ मध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे सावळारामांनी हे पद सोडलं. त्यांच्यानंतर समाजकल्याणमंत्री दादासाहेब रुपवते अध्यक्ष झाले आणि संस्थेचं काम अधिक गतीने चाललं. अखेर १९७८ साली ही संस्था बंद झाली.
चित्रपट कथा लेखन
१९५५ साली माधव शिंदे यांनी निर्मिती केलेलं ‘बाळ माझं नवसाचं’ या चित्रपटाचं कथालेखन करण्याची संधी माधव शिंदेंनी सावळारामांना दिली. या चित्रपटातील गीतं तर ते स्वतः लिहीत होतेच.
१९६२ मध्ये निर्माते दिनकर जोशी यांनी ‘पुत्र व्हावा असा’ या चित्रपटाची निर्मिती केली. चित्रपटाचे दिग्दर्शक होते राजा ठाकूर. या चित्रपटाची मूळ कथा सावळारामांची होती.
१९६९ साली सावळारामांनी ‘नांदायला जाते’ या चित्रपटाचं कथालेखन केलं. चित्रपटाचे दिग्दर्शक यशवंत पेठकर होते, तर संगीत वसंत प्रभू आणि राम कदम यांचं होतं. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती देखील सावळारामांनीच केली होती. चित्रपटात अरुण सरनाईक, रत्ना, दादा साळवी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. कलाकारांनी चित्रपटाच्या लोकप्रियतेत भर घातली.
वसंत प्रभू आणि राम कदम यांनी दिलेलं संगीत आणि चित्रपटातील लावणी गीते विशेष लोकप्रिय झाली. व्यावसायिकदृष्ट्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. ‘नांदायला जाते’ हा त्या काळातील एक यशस्वी आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला मराठी चित्रपट मानला जातो.
आकाशवाणी
सावळारामांनी आकाशवाणी - मुंबई केंद्रासाठी २२ हून अधिक लोकनाट्यं, लघुनाट्यं आणि सांगीतिका लिहिल्या. या प्रकल्पांतून त्यांनी प्रेक्षकांशी थेट संवाद साधून सामाजिक जाणीव आणि लोकशिक्षण यांचं प्रसारण केलं. यामध्ये १४ लोकनाट्य, ६ लघुनाट्य आणि २ सांगीतिका यांचा समावेश आहे.
सावळारामांनी लिहिलेल्या लोकनाट्यांत पुढील नाट्यांचा समावेश होतो: १) गाव पंचायत, २) मशाल, ३) सार, ४) चंद्रभागेतीरी, ५) आपण सारे भाई भाई, ६) साद, ७) कामधेनू, ८) संत रामदास, ९) अनेक असती जाती परि एकच / आमची माती, १०) नवलाख दिवे लखलखती, ११) जोतिबाची पालखी, १२) दुनियेचे राजे, १३) करू देशाची चाकरी, १४) पुढं पाऊल पुढे.
त्यांनी लिहिलेली लघुनाट्ये अशी : १) चंद्रसेना, २) सोन्याची कौलं, ३) ब्रह्मराक्षस, ४) चाळीतलं सौभद्र, ५) वीस पाऊले पुढे, ६) माणसा आधी हो माणूस.
सावळारामांनी लिहिलेल्या संगीतनाटिकांत १) कृष्णाकाठी २) वृंदा यांचा समावेश होतो.
सावळारामांचं कार्य केवळ काव्यरचनेपुरतं मर्यादित नव्हतं, तर चित्रपट कथालेखन, आकाशवाणीवरील लोकनाट्यांतूनही त्यांची व्यापक सर्जनशीलता दिसून येते. त्याचबरोबर, त्यांनी केवळ कला, साहित्य आणि लोकसंस्कृती या क्षेत्रांसाठी आपलं आयुष्य समर्पित केलं नव्हतं, तर सामाजिक, राजकीय क्षेत्रातही त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण ठरलं. त्यांच्या कार्यातून समाजशीलता, लोककलेविषयी कळकळ आणि कलावंतांप्रती आपुलकी जाणवत राहते. म्हणूनच सावळारामांचं कार्य, त्याचा विस्तार आणि प्रभाव केवळ एका कलावंताचं नव्हे, तर समाजाला दिशा देणाऱ्या संवेदनशील संस्कृतीपुरुषाचं योगदान ठरतं, जे पुढील कित्येक पिढ्यांना प्रेरणादायी आहे.