“साता समिंदराचं माणिक मोती । देवाच्या हातानं आलं रे खालती । झेललं रे झेललं वरच्या वरती । पिकाच्या डोईवर कणसात भरतंय ।”
“साता समिंदराचं माणिक मोती । देवाच्या हातानं आलं रे खालती । झेललं रे झेललं वरच्या वरती । पिकाच्या डोईवर कणसात भरतंय ।”
सावळाराम यांच्या जीवनात समाजकारणाची ओळख झाली ते १९६० नंतर. सहसा ते गर्दीपासून दूर राहणं पसंत करत असत. सावळाराम १९४४ मध्ये ठाण्यात स्थायिक झाले, परंतु त्यांच्या ठाण्यातील राजकीय व सामाजिक जीवनाची खरी सुरुवात १९६० मध्ये झाली.
७ मे १९६० साली ठाणे येथे झालेल्या ४२व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला सावळाराम केवळ उपस्थितच नव्हते, तर त्यांचा मोठा सहभाग होता. संमेलनाचे स्वागताध्यक्ष वामनराव ओक यांनी आपल्या भाषणात मांडलेला ‘साहित्याचे स्वरूप सुंदर असले तरी साहित्याचा हेतू समाजात सत्प्रवृत्ती निर्माण करणे व राष्ट्रीय वृत्ती निर्माण करणे हा आहे!’ हा विचार सावळारामांना अतिशय प्रेरक वाटला आणि इथेच त्यांच्या मनात समाजकारणाची ठिणगी पडली.
सावळारामांचे साहित्यिक मित्र नी. गो. पंडितराव हे ठाण्याच्या राजकीय व सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक होते. त्यांनी सावळारामांना समाजकारणात येण्यासाठी उद्युक्त केलं. पंडितरावांनी आग्रह करून १९६२ सालच्या नगरपालिकेच्या निवडणुकीस सावळारामांना उभं केलं. सावळाराम हे तसे राजकारणी कधीच नव्हते आणि त्यांना निवडून येण्याची खात्रीही नव्हती. मात्र तरीदेखील ते निवडून आले.
सावळाराम यांच्यासारखा पदवीधर, सुशिक्षित आणि साहित्यिक नगरसेवक मिळाल्यामुळे १९६३ साली त्यांची शिक्षण समितीचे सभापती म्हणून निवड झाली. सभापती झाल्यावर त्यांनी त्वरित शिक्षकांच्या हितासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यापैकी एक म्हणजे त्यांनी शाळांमधील शिक्षकांचा पगार चाळीस रुपयांवरून थेट शंभर रुपये केला.
त्याच वर्षी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ठाण्यात आले असताना त्यांनी सावळारामांना ‘तुम्हाला काय हवं आहे?’ असे विचारले असता, त्यांनी स्वतःसाठी काहीही न मागता लोकांना आपल्याला सहज संपर्क करता यावा यासाठी फक्त ‘टेलिफोन’ मागितला. लवकरच त्यांच्या घरी टेलिफोन आला, जो संताजी शिबिरातील पहिला टेलिफोन ठरला. सावळारामांनी मागितलं असतं तर त्यांना एखादं प्रशस्त घर नक्कीच देऊ केलं गेलं असतं. परंतु असं काही मागावं हे त्यांच्या मनातही आलं नाही. सावळारामांचा साधेपणा या प्रसंगातून स्पष्टपणे दिसून येतो.
सावळाराम अपक्ष असले तरी त्यांचे सर्व पक्षातील नगरसेवकांशी चांगले संबंध होते. यामुळे १९६५ साली फारशा अडचणी न येता त्यांची नगरपालिकेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. त्याच वर्षी त्यांना ‘जे. पी.’ (जस्टिस ऑफ पीस) हे पदही मिळालं. पुढील पाच वर्षे ते या पदावर होते.
जे. पी. म्हणून त्यांना महत्त्वाच्या दस्तऐवजांच्या नक्कलप्रती अटेस्ट करण्याचे अधिकार होते. सही करण्यासाठी लोक दस्तावेजांचे गठ्ठे घेऊन त्यांच्याकडे येत. कारण एकच — इतर जे. पी. प्रत्येक सहीसाठी पाच रुपये मागत असत, तर सावळाराम कंटाळा न करता विनामूल्य सह्या करत.
उपाध्यक्ष म्हणून सावळारामांच्या कामाचा विलक्षण झपाटा पाहून त्यांची लोकप्रियता खूप वाढली. अनेक नगरसेवकांच्या मनात पुढच्या वर्षी सावळाराम ‘अध्यक्ष व्हावेत’ असं होतं, पण ते अपक्ष होते हा एक मोठा अडथळा होता. नगरपालिकेत त्यावेळी काँग्रेस, जनसंघ व कम्युनिस्ट असे तीन पक्ष होते. काँग्रेसकडे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार नव्हता, म्हणून काँग्रेसश्रेष्ठींनी सावळारामांना पाठिंबा देण्याचं ठरवलं, मात्र काँग्रेस अल्पमतात होती.
या महत्त्वपूर्ण निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक, प्रदेशाध्यक्ष वसंतदादा पाटील आणि विधान परिषदेचे सदस्य ग. दि. माडगूळकर यांनी रणनीती आखली. वसंतदादांनी प्रदेश सरचिटणीस शरद पवार यांच्यावर सावळारामांना अध्यक्ष करण्याची जबाबदारी सोपवली. ग. दि. माडगूळकरांनी सावळाराम पाटील, म्हणजेच कवी पी. सावळाराम यांच्या नावाची शिफारस केली. शरद पवार यांनी ठाण्यात येऊन काँग्रेस नेते प्रभाकर हेगडे आणि वसंतराव डावखरे यांच्यासोबत बैठका घेतल्या आणि सावळाराम निवडून येतील यासाठी सर्व तयारी केली.
३० जून १९६६ रोजी नगराध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. अपक्ष सावळाराम विरुद्ध त्यांचे मित्र, कम्युनिस्ट पक्षाचे गुणाकर जोशी उभे होते. सावळारामांना ३३ मते मिळाली आणि त्यांचा विजय झाला; ते ठाण्याचे नगराध्यक्ष झाले.
आचार्य अत्रे यांनी ‘दै. मराठा’ वृत्तपत्रातून सावळारामांचं अभिनंदन केलं. ग. दि. माडगूळकरांनीही पत्र लिहून सावळारामांचं ‘त्रिवार अभिनंदन’ केलं. सातारा जिल्ह्यातील एका खेड्यात जन्मलेला काव्यवेडा माणूस मुंबईच्या परिसरातील एका नगराच्या नगरपालिकेचा लोकनियुक्त अध्यक्ष होतो, ही घटना भाग्यसूचक आहे, असं त्यांनी म्हटलं.
सावळाराम नगराध्यक्ष असताना पालिकेचं बजेट अतिशय तुटपुंजं होतं. मात्र, बजेट कमी असूनही सावळारामांनी ठाण्यासाठी एक स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आणि ड्रेनेज योजना यशस्वीरित्या मार्गी लावल्या. त्यांची कारकिर्द एक वर्षाची होती. या काळात त्यांनी सुमारे एक हजार प्लॅन्स पास केले. यात श्रीरंग सोसायटीसारख्या मोठ्या सोसायटीचा प्लॅनही समाविष्ट होता. सावळाराम अत्यंत नि:स्पृह आणि निरिच्छ होते; त्यांनी अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत कधी पैसे खाल्ले नाहीत की कुणाला खाऊ दिले नाहीत.
अनेक बड्या राजकीय नेत्यांशी मैत्री असूनही त्यांनी कधीच स्वतःसाठी तिचा फायदा घेतला नाही. नगराध्यक्ष झाल्यावरही ते केवळ दोन खोल्यांच्या साध्या घरात राहत होते, ज्याचं लोकांना आश्चर्य व कौतुक वाटत असे. सार्वजनिक क्षेत्रात ते कमलपत्राप्रमाणे अलिप्त राहिले.
नगराध्यक्ष म्हणून आपली कारकिर्द ‘जनतेच्या सेवेत’ अत्यंत चोखपणे घालवून मुदत संपल्यावर सावळाराम समाधानाने पायउतार झाले. १९६७ सालच्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा निवडणूक न लढवण्याचं ठरवलं आणि राजकारणातून निवृत्ती घेतली. पालिकेत सर्वोच्च पद भूषवल्यानंतर पुन्हा सामान्य सदस्य म्हणून राहणं त्यांना योग्य वाटलं नाही.
मावळते नगराध्यक्ष म्हणून सावळारामांनी शिवसेनेचे पहिले नगराध्यक्ष वसंतराव मराठे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. नगराध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यावर समस्त ठाणेकरांनी हृद्य सत्काराचे अर्घ्य देऊन या ‘मावळत्या दिनकरा’प्रती कृतज्ञता व्यक्त केली. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या हस्ते झालेल्या या सत्कार सोहळ्यामुळे सावळाराम भारावून गेले.