“साता समिंदराचं माणिक मोती । देवाच्या हातानं आलं रे खालती । झेललं रे झेललं वरच्या वरती । पिकाच्या डोईवर कणसात भरतंय ।”
“साता समिंदराचं माणिक मोती । देवाच्या हातानं आलं रे खालती । झेललं रे झेललं वरच्या वरती । पिकाच्या डोईवर कणसात भरतंय ।”
सावळारामांच्या जीवनात ‘समाजकारण’ १९६० नंतर आले, परंतु एकदा समाजकारणाचा वसा घेतल्यावर त्यांनी शिक्षण क्षेत्राला दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आणि चिरंजीव ठरले.
ज्या ठाणे शहरात १८२१ मध्ये पहिली इंग्रजी शाळा सुरू झाली होती आणि अल्पावधीत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विस्तारलं होतं, त्याच ठाणे शहरात १९७० सालापर्यंत एकही महाविद्यालय नव्हतं. शालेय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मुंबई किंवा इतर बाहेरच्या शहरांमध्ये प्रवेश घ्यावा लागत असे. सावळारामांसारख्या अनेक शिक्षणप्रेमी व्यक्तींना या गोष्टीचं वाईट वाटत असे. ठाण्यात महाविद्यालय सुरू करण्यासाठी काय करता येईल, याचा विचार शिक्षणप्रेमी मंडळी करत होती.
ठाण्यात महाविद्यालय सुरू करण्यासाठी सावळाराम यांनी आपल्या राजकीय संपर्कांचा उपयोग करून घेण्याचा निर्णय घेतला. सरकार दरबारी सावळारामांची चांगली ओळख असल्यामुळे, बेडेकर विद्यालयाचे संस्थापक डॉ. वा. ना. बेडेकर आणि त्यांचे मित्र गुणाकार जोशी यांनी सावळारामांसोबत तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब देसाई यांना भेटायचं ठरवलं.
सावळारामांनी बाळासाहेब देसाई यांना ठाण्यातील विद्यार्थ्यांची गैरसोय सांगितली. देसाईंच्या मदतीने खाडीच्या काठी कोळीवाड्यात कॉलेजसाठी दहा एकर जागा नाममात्र दहा रुपये भाड्याने मंजूर करण्यात आली.
या जागेवर ‘विद्या प्रसारक मंडळा’च्या कॉलेजच्या इमारतीचं बांधकाम सुरू झाल्यावर कोनशीला समारंभासाठी बाळासाहेब देसाई अध्यक्ष म्हणून आले होते. त्यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी भाषणं केली, पण एकाही वक्त्याने ही जागा सावळारामांनी मिळवून दिल्याचं नमूद केलं नाही. हे बाळासाहेब देसाई यांच्या लक्षात आलं. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्पष्टपणे नमूद केलं की, त्यांनी ही जागा केवळ सावळारामांसारख्या ऋषितुल्य आणि सत्प्रवृत्तीच्या माणसाकडे पाहूनच दिलेली आहे. अशा प्रकारे, सावळारामांच्या प्रयत्नांमुळे ठाणे शहरात पहिलं महाविद्यालय उभं राहिलं.
ज्या पहिल्या महाविद्यालयाला जागा मिळाली, तिथे जास्त गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळायचा, कमी गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसे. अशा विद्यार्थ्यांसाठी दुसरं महाविद्यालय असावं, असा विचार शिवसेना नेते सतीश प्रधान यांच्या मनात आला होता. त्यांनी हा विचार त्यांचे मित्र सावळाराम आणि रामभाऊ देवळे यांना सांगितला.
या तिघांच्या प्रयत्नांतून १९८० साली ‘ज्ञानसाधना महाविद्यालयाची’ स्थापना झाली. सावळाराम या संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाचे बारा वर्षे उपाध्यक्ष होते. महाविद्यालयाच्या उभारणीत आणि नंतरही संस्थेला बहुमोल मार्गदर्शन करण्यात त्यांचा फार मोठा सहभाग होता.
सुरुवातीला ज्ञानसाधना महाविद्यालय विनाअनुदानित होतं, त्यामुळे शिक्षकांना पगार देण्यासाठी पैसे नसत, अशावेळी सावळारामांच्या संवेदनशील मनाला अस्वस्थता वाटायची. त्यांनी या शिक्षकांच्या मदतीसाठी एक तोडगा काढला. त्यांनी काही किराणा मालाच्या दुकानदारांना शिक्षकांच्या घरी आवश्यक सामान पुरवण्याच्या सूचना दिल्या आणि त्यांची बिले नंतर भागवली. काही वेळा तर, शिक्षकांचे पगार करण्यासाठी त्यांनी मुलीकडून पैसे घेतले. पी. सावळाराम, सतीश प्रधान आणि इतर काही सहकाऱ्यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा करून १९९० सालापर्यंत महाविद्यालयाला अनुदान मिळवून दिलं.
सावळारामांचं शिक्षण क्षेत्रातील योगदान ठाण्यापुरतंच मर्यादित नव्हतं. मुलुंड येथे प्रसिद्ध उद्योजक भाऊसाहेब केळकर यांना कला शाखेचं केळकर कॉलेज आणि शास्त्र शाखेचं वझे कॉलेज सुरू करायचं होतं, पण शासनाकडून परवानगी मिळत नव्हती. सावळारामांनी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना भेटून मुलुंडच्या वझे कॉलेजला परवानगी मिळवून दिली.
पुढे या कॉलेजला जाण्यासाठी रस्त्याची मोठी अडचण होती, कारण कॉलेजजवळ झोपडपट्टी होती. सावळारामांनी मुलुंडला जाऊन त्या झोपडपट्टीतील एक स्थानिक प्रभावशाली व्यक्ती तुकाराम दादांना भेटून रस्त्याची समस्या सांगितली. सावळारामांच्या शब्दाचा मान ठेवत तुकाराम दादांनी नुसता होकारच दिला नाही तर, स्वतःच्या खर्चाने रस्ता बांधून दिला.
शिक्षण व साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल १९८९ मध्ये ठाणे महानगरपालिकेने सावळारामांचा अमृतमहोत्सवी सत्कार केला. १९९४ मध्ये वयाच्या ८१ व्या वर्षी ज्ञानसाधना महाविद्यालयाकडून मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते झालेला त्यांचा सत्कार हा त्यांच्या आयुष्यातील शिक्षण संस्थेकडून झालेला शेवटचा सत्कार ठरला.
सावळारामांनी आपलं संपूर्ण आयुष्य नि:स्पृहतेने समाजकार्य करण्यात घालवलं. सार्वजनिक हितासाठी ते ‘भिक्षांदेही’ करायला संकोच करत नसत, मात्र स्वतःसाठी त्यांनी कधीही काही मागितलं नाही. त्यांनी ठाण्यातील महाविद्यालयीन शिक्षणाची कवाडं उघडली, अनेक विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार दिला आणि शिक्षकांना मान मिळवून दिला. सावळाराम हे ठाण्याच्या शैक्षणिक इतिहासाचे आणि समाजकारणाचे असे आधारस्तंभ ठरले, ज्यांनी उच्चपद भूषवलं असूनही कमलपत्राप्रमाणे अलिप्त राहून केवळ जनकल्याण साधलं.