“साता समिंदराचं माणिक मोती । देवाच्या हातानं आलं रे खालती । झेललं रे झेललं वरच्या वरती । पिकाच्या डोईवर कणसात भरतंय ।”
“साता समिंदराचं माणिक मोती । देवाच्या हातानं आलं रे खालती । झेललं रे झेललं वरच्या वरती । पिकाच्या डोईवर कणसात भरतंय ।”
सावळारामांचं कौटुंबिक जीवन त्यांच्या साहित्याच्या वैभवाप्रमाणेच नितांत आपुलकी आणि नात्यांनी गुंफलेलं होतं. चित्रपटांसाठी गाणी लिहिण्याच्या धावपळीतही त्यांनी आपलं गृहविश्व जपलं. सुनंदाबाईंनी त्यांना मोलाची साथ दिली. त्यांच्या येडेनिपाणी–सातारा–कोल्हापूरमधल्या आयुष्यानं, वैवाहिक जीवनानं, मुलांच्या संगोपनानं आणि संपन्न उत्तरार्धानं सावळारामांचं कौटुंबिक जीवन अत्यंत समृद्ध केलं.
येडेनिपाणी
सावळारामांच्या भावंडांत फक्त सावळाराम आणि शंकरराव हे दोघेच पदवीधर होऊ शकले, तर भास्कर मॅट्रिक झाला. बाकीच्या भावंडांची शाळेपुढे मजल गेली नाही. शंकरराव सिडनेहॅम कॉलेजमध्ये रजिस्ट्रार होते आणि मुंबईतच राहायचे. सीताराम पुण्यात स्थायिक झाले, तर भास्कर आणि पद्माकर सांगलीत स्थायिक झाले. बाजीराव येडेनिपाणीला शेती करायचे. थोरली सुलोचना आणि धाकटी शकुंतला यांची लग्नं होऊन त्यांनी सुखानं संसार केला.
सावळारामांच्या पाठीवरचे भाऊ हिन्दुराव यांना कुटुंबात ‘अप्पा’ म्हणून संबोधलं जायचं. हिन्दुराव स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकार्यात होते, तर नंतरच्या काळात त्यांनी येडेनिपाणीत शेती करायला सुरुवात केली. १९६० ते १९६४ या चार वर्षांसाठी हिन्दुरावांना येडेनिपाणीमध्ये ‘प्रथम नागरिकाचा’ मान मिळाला. ते येडेनिपाणीच्या ग्रामपंचायतीचे सरपंचही होते. १९७४ मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना हिन्दुरावांना स्वातंत्र्यवीरांचा ताम्रपट मिळाला. या समारंभाला त्यांचं संपूर्ण कुटुंब हजर होतं.
सावळाराम मोठे कवी आणि लेखक असल्यामुळे धाकट्या भावंडांना त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती वाटत असे. सावळाराम शिक्षणाच्या निमित्तानं घरापासून कायम दूर राहिले. ठाण्यात स्थलांतरित झाल्यावर ते चित्रपट संगीताच्या विश्वात मग्न झाले. सावळारामांचं येडेनिपाणीला येणं-जाणं कमीच झालं. जेव्हा जात तेव्हा त्यांच्याबरोबर मित्रमंडळी असायची. त्यामुळे त्यांचं तेथील वास्तव्य गडबडीतच असायचं. परंतु त्या थोड्या वेळातच ते सर्वांची आपुलकीनं चौकशी करायचे.
सावळारामांचे वडील आबाजी यांचं आयुष्य येडेनिपाणीमध्ये शेती आणि कुटुंबाचं संगोपन यातच गेलं. १९६३ साली त्यांचं निधन झालं. सावळारामांच्या आई भागीरथीबाई या येडेनिपाणीच्या ग्रामपंचायतीच्या दहा वर्षे सदस्य होत्या. त्या काही दिवस ठाण्याला सावळारामांकडे राहायला आल्या होत्या. त्यांनी सावळाराम आणि सून सुनंदाबाई यांचा सुखी संसार पाहून दोघांना आशीर्वाद दिला. १९७६ मध्ये त्यांचं निधन झालं.
ठाण्यातील संसार
१९४४ साली सावळाराम, पत्नी सौ. सुनंदाबाई आणि चार महिन्यांची मुलगी प्रतिभा यांच्यासह ठाणे येथे ‘संताजी शिबिरा’त राहायला आले. ठाण्यालाच त्यांच्या संसाराला सुरुवात झाली. प्रतिभाच्या पाठीवर कल्पनाचा जन्म झाला. ११ मे १९५० रोजी सावळाराम–सुनंदाताईंना पुत्ररत्न जन्माला आलं. त्याचं नाव संजय ठेवण्यात आलं. त्यानंतर ४ डिसेंबर १९५३ रोजी दाम्पत्याला अजून एक मुलगा झाला. त्याचं नाव राजीव ठेवण्यात आलं.
मुलांना सावळारामांच्या गीतलेखनाचा अभिमान होता. त्यांना सावळारामांची गीतं तोंडपाठ असायची. सावळारामांच्या घरी सिनेमातील अनेक मोठी माणसं येत. आशा भोसले, लता मंगेशकर, हृदयनाथ, रमेश देव, सीमा देव, सुलोचना चव्हाण आणि धुमाळ अशी मंडळी येत असत. ही मंडळी येत तेव्हा त्यांना पाहण्यासाठी अलोट गर्दी जमत असे. सिनेमाकलावंतांप्रमाणेच तमाशा कलावंत देखील येत. वसंत प्रभू तर कायमच येत, आणि अनेकदा त्यांचा मुक्काम सावळारामांच्या घरी असे.
प्रतिभानं १९६३ साली फडके या ब्राह्मण कुटुंबात परस्पर प्रेमविवाह ठरवला. सावळारामांना आंतरजातीय विवाह मान्य नव्हता. १४ मे १९६३ रोजी प्रतिभाचा विवाह संपन्न झाला. तिच्या लग्नात सावळारामांच्या स्वतःच्या लग्नात जो प्रकार घडला होता, त्याचीच पुनरावृत्ती झाली. प्रतिभाच्या लग्नाला सावळाराम आणि सुनंदाबाई हजर नव्हते, पण धाकटी भावंडं मात्र आवर्जून हजर होती. मात्र सावळारामांनी राग मनात धरला नाही. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी प्रतिभा आणि तिच्या पतीला चहाला घरी बोलावलं. प्रतिभाचा संसार सुखी ठरला.
सावळारामांची द्वितीय कन्या कल्पना हिच्यावर त्यांचा फार जीव होता, आणि तिचं खूप कौतुकही होतं. कल्पनानं मॅट्रिक झाल्यावर रुईया कॉलेजला ॲडमिशन घेतली आणि पुढे तिनं डॉक्टरीचा अभ्यास पूर्ण केला. कल्पनाचा प्रेमविवाहही आंतरजातीयच होता, पण यावेळी मात्र सावळाराम चिडले नाहीत. सामाजिक परिस्थिती बदलली होती. सावळारामांनी कल्पनाचं लग्न धुमधडाक्यात लावून दिलं. डॉ. कल्पना आणि डॉ. सुचील पाठारे यांचा विवाह २१ जानेवारी १९७७ रोजी झाला. दुसऱ्या दिवशी झालेल्या स्वागत समारंभाला चित्रपट आणि राजकीय क्षेत्रातील मोठी मंडळी उपस्थित होती.
१ जानेवारी १९७८ रोजी संजयचा प्रेमविवाहही कल्पनासारखाच धुमधडाक्यात झाला. धाकटा मुलगा राजीव याचा विवाह ३१ मे १९८२ रोजी नात्यातच झाला. सावळारामांचं घर दोनच खोल्यांचं असल्यामुळे राजीव लग्नानंतर दुसरीकडे राहू लागला. संजय आणि त्याची पत्नी गीता हे सावळारामांबरोबर राहायचे.
१० फेब्रुवारी १९८६ हा दिवस सावळारामांच्या कुटुंबासाठी ‘काळा दिवस’ ठरला. सावळारामांचे जावई, डॉ. कल्पनाचे पती डॉ. सुचील यांचं एका दुर्दैवी अपघातात निधन झालं. तरुण जावयाच्या अकाली जाण्यानं सावळाराम अत्यंत दुःखी झाले आणि खचून गेले. परंतु मुलीला परत आयुष्यात रमण्यासाठी फार मोठा आधार सावळारामांनी दिला. कल्पनाला दोन लहान मुलं होती, डॉक्टरी पेशा होता. तिच्या धावपळीत मुलांकडे लक्ष देता यावं म्हणून सुनंदाबाई मदतीला तिच्याकडे जाऊन राहिल्या.
१९८० मध्ये आलेला ‘भालू’ हा चित्रपट सावळारामांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर त्यांनी गीतरचनेच्या क्षेत्रातून निवृत्ती घेतली. त्याचबरोबर दोन्ही मुलींची आणि दोन्ही मुलांची लग्नं झाल्यामुळे सावळाराम प्रापंचिक जबाबदारीतूनही मोकळे झाले.
पावणे सहा फूट उंची, गहूवर्ण, भावपूर्ण डोळे, आणि हसतमुख यामुळे निवृत्तीनंतरही सावळारामांचं व्यक्तिमत्त्व प्रसन्न दिसत असे. लांब बाह्यांचा सदरा, त्यावर गडदरंगी वुलनचा स्वेटर आणि गळ्याभोवती मफलर असा त्यांचा अतिशय साधा पेहराव असे. अस्सल कोल्हापुरी बाजाची त्यांची भाषा होती. ते अतिशय गप्पिष्ट होते, ते डोळ्यांतून बोलत असत आणि मिष्किलपणा, सडेतोडपणा त्यांच्या बोलण्यातून जाणवत असे. ठाण्यात ते नेहमी पायी फिरत असत. अख्खे ठाणे शहर त्यांना ओळखत होते. सावळाराम जगन्मित्र होते. त्यांना बोलायला वयोमानाचं बंधन नव्हतं; ते लहान मुलांपासून विद्यार्थी, तरुण, समवयस्क, ज्येष्ठ, अगदी सर्वांशी तन्मयतेनं बोलत-वागत असत. अहंकाराची काठी कोपऱ्यात टाकल्यामुळे त्यांच्यात विनयशीलता होती.
निवृत्तीनंतर सावळारामांचा दिवस नेहमीच ठरलेल्या शिस्तीने सुरू होत असे. सकाळी सातला उठून ते चहा घेत, वर्तमानपत्र वाचत. त्यानंतर त्यांचा ठरलेला नाश्ता असे. नाश्त्याच्या वेळी ते आठवणीनं औषधं घेत. त्यानंतर अंघोळ आणि देवधर्म. दुपारचे जेवण झाल्यावर ते वामकुक्षी घेत. दुपारच्या चहानंतर मित्र, नातेवाईकांची विचारपूस, नवीन वाचनीय गोष्टी शोधणे, हे त्यांचे आवडते काम. संध्याकाळी ते रंगायतनपर्यंत फिरायला जात. रस्त्यातले बुक स्टॉल्स हे त्यांचं नेहमीचं थांबण्याचं ठिकाण असे. रात्री जेवणानंतर ते कट्ट्यावर जाऊन सर्वांबरोबर गप्पा मारत. घरी परतल्यावर ‘श्रीराम जयराम जयजय राम’चा मुखी जप करत ते झोपत. या सगळ्या दिनक्रमात सावळारामांची सून गीता त्यांची तब्येत सांभाळत असे.
सावळारामांना एकूण आठ नातवंडं होती: प्रतिभाची मुलं – मंदार, सचिन; कल्पनाची – ओमर आणि चांदुली; संजयची – ओंकार आणि संपदा; आणि राजीवची – अमृता आणि करिष्मा. या साऱ्याच नातवंडांनी सावळारामांचं गृहविश्व व्यापून टाकलं होतं. नातवंडांवर त्यांचा फार जीव होता.