“साता समिंदराचं माणिक मोती । देवाच्या हातानं आलं रे खालती । झेललं रे झेललं वरच्या वरती । पिकाच्या डोईवर कणसात भरतंय ।”
“साता समिंदराचं माणिक मोती । देवाच्या हातानं आलं रे खालती । झेललं रे झेललं वरच्या वरती । पिकाच्या डोईवर कणसात भरतंय ।”
ज्ञानसाधना महाविद्यालयाने सावळारामांप्रती वाटणारी कळकळ, जिव्हाळा आणि प्रेम लक्षात घेऊन, तसेच संस्थेसाठी त्यांचं असलेलं बहुमोल मार्गदर्शन आणि संस्थेला अनुदान मिळवून देण्यातला त्यांचा वाटा लक्षात घेऊन, १९९५ मध्ये त्यांचा योग्य सन्मान केला.
सावळारामांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ज्ञानसाधनातर्फे १९९५ साली ‘जनकवी पी. सावळाराम गौरवग्रंथ’ काढण्यात आला. ग्रंथाचं संपादन सावळारामांचे शिक्षण क्षेत्रातले स्नेही, ठाण्यातले डॉ. दाऊद दळवी यांनी केलं. लता मंगेशकर यांनी ग्रंथाला लिखित शुभेच्छा पाठवल्या, तर मंगेश पाडगावकर, दिनकर पाटील, दत्ता डावजेकर, रमेश देव इत्यादी दिग्गजांनी आपल्या सावळारामांबरोबरच्या आठवणी कथन करणारे लेख लिहिले.
सावळारामांनी वयाची ८१ वर्षं पूर्ण केली, हे निमित्त साधून ज्ञानसाधना महाविद्यालयाने त्यांचा सत्कार केला. हा सत्कार समारंभ मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला. या सत्कार समारंभाला वन-दारूबंदी मंत्री गणेश नाईक, मंत्री ताबीर शेख, सतीष प्रधान, रामभाऊ देवळे आणि प्राचार्य डॉ. दाऊद दळवी यांसारखी मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी सावळारामांबरोबरच त्यांच्या पत्नी सौ. सुनंदाबाई यांचाही सत्कार केला गेला. या भेटीदरम्यान सावळारामांनी त्यांची गाजलेली कविता “आई कुणा म्हणू मी तुजवीण सांग आई?” स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना दिली.
शिक्षण क्षेत्रात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या सावळारामांसारख्या कर्मयोग्याचा हा शेवटचा सत्कार ठरला. महाविद्यालयाने त्यांची स्मृती कृतज्ञतेने जपली असून, ज्ञानसाधना महाविद्यालयाने ‘जनकवी पी. सावळाराम सांस्कृतिक सभागृह’ बांधलं आहे.
जावयाच्या निधनानंतर पत्नी सुनंदाबाई मुलीच्या मदतीसाठी तिच्याकडे राहायला गेल्यामुळे, सावळारामांना संजय आणि सूनबाई गीता सांभाळत असत. सावळारामांच्या आवडीनिवडी, औषधं, पथ्यपाणी हे सर्व सूनबाई गीता प्रेमाने आणि हसतमुखाने सांभाळत असे. उत्तर आयुष्यात मेंदूला रक्तपुरवठा नीट होत नसल्यामुळे सावळारामांना बऱ्याच वेळा थकवा यायचा.
उतार वयात सावळाराम रोज ज्ञानेश्वरी वाचायचे. निधनापूर्वी साधारण एक आठवडा आधी, त्यांनी सौ. गीता यांना आपली सर्व गाणी ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे त्यांनी दोन तीन दिवस गाणी ऐकली, आणि ‘शरण तुला भगवंता’ हे गाणे ते नंतर सतत गुणगुणत होते. कदाचित त्यांना आपल्या जाण्याचे संकेत मिळाले असावे.
बुधवार, १७ डिसेंबर १९९७ रोजी त्यांनी नेहमीप्रमाणे ज्ञानेश्वरी वाचली. त्यांना जास्त थकवा आला, आणि मेंदूला झिणझिण्या आल्यामुळे ते खालीच बसले. दुपारी विश्रांतीनंतर उठल्यावर त्यांचा तोल गेला आणि ते पडले. गुरुवार, १८ डिसेंबर १९९७ रोजी डॉ. कल्पनाच्या ठाणे, पूर्व येथील ‘अंकुर हॉस्पिटल’मध्ये त्यांना दाखल केलं. दोन दिवस ठीक गेले, पण रविवार, दिनांक २१ तारखेला पहाटे अडीचच्या सुमारास सावळारामांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. बरेच उपचार केले गेले. परंतु २१ डिसेंबर १९९७ रोजी सकाळी सहा वाजता सावळारामांचं निधन झालं.
पी. सावळाराम साहित्यिक, व्यावसायिक आणि कौटुंबिक दृष्ट्या तृप्त जीवन जगले. सावळारामांचा देह अनंतात विलीन झाला असला तरी, जोपर्यंत मराठी भाषा आणि मराठी संस्कृती जिवंत आहे, तोपर्यंत त्यांच्या लेखणीतून उमटलेल्या शब्दांतून ते अमर राहतील.